ब्रेनवृत्त । नवी दिल्ली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिन्ही सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतर या निर्णयावर लवकर शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या २४ नोव्हेंबर रोजी होणार्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मंजूरीवर अंतिम निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक 20 नोव्हेंबर रोजी जयंतीच्या निमित्ताने तिन्ही कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीतील अंतिम निर्णयानंतर तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मांडला जाईल. संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरला सुरु होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आगामी बैठकीचा अजेंडा तिन्ही कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याचा असल्याचेही म्हटले आहे.
“शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) कायदा 2020, शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी आणि शेतकी सेवा कायदा, 2020 आणि जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, 2020 – हे तिन्ही कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव बुधवारी होणार्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी विचारात घेतला जाईल”, असे एका मंत्रिमंडळातील घडामोडींशी संबंधित सूत्राने माध्यमांना सांगितले आहे.
वाचा । सत्तासंघर्षाच्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात ३०० शेतकरी आत्महत्या!
पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी सकाळी केलेल्या घोषणेनंतर मंत्रिमंडळ संघ शासनाचे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यावर जोर देत आहे. दुसरीकडे, शासनाच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या शेतकरी आंदोलनाची लवकरच वर्षपूर्ती होत आहे.
दरम्यान, संघ शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे २०२२ मध्ये पार पडणाऱ्या उत्तर प्रदेश आणि पंजाब यांसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांमधील काही घटकामध्ये असलेली भाजपविरोधी भूमिका कमी होण्याची अपेक्षा आहे.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in