प्रतिनिधी । मराठीब्रेन
ब्रेनवृत्त । भंडारा
मागील वर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे भंडारा जिल्ह्याच्या शासकीय धान्य कोठारातील (गोडाऊन) कोट्यवधी रुपयांचा तब्बल ४,७२७ क्विंटल धान्यसाठा अक्षरश: सडला. हा सडलेला धान्यसाठा खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल पुणे येथील तीन प्रयोगशाळांनी दिल्यानंतर आता त्यास उचलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी राज्य शासनाने नुकतीच परवानगी दिली असून, हा वाया गेलला धान्यसाठा कृषी विद्यापीठाला तयार करण्यासाठी देण्यात येईल.
२८ ऑगस्ट २०२० च्या मध्यरात्री महापुराने भंडारा शहराला वेढले होते. २९, ३० व ३१ ऑगस्टपर्यंत असे सलग ती दिवस महापुराचे पाणी ओसरले नव्हते. या महापुरात अनेक घरे व कुटुंब उध्वस्त झाली. या महापुराचे पाणी शासकीय धान्य कोठारामध्येही शिरल्याने तेथील तांदूळ, गहू, साखर, तूळ डाळ व हरभऱ्याची डाळ अशा सुमारे १ कोटी १८ लाखांचे ४ हजार ४२७ क्विंटल धान्य ओले होऊन नंतर सडले.
पूर ओसरल्यानंतर शासकीय यंत्रणेने कोठारातील उरलेले चांगल्या दर्जाचे धान्य वापरात आणले आणि उर्वरित सडलेल्या धान्याचे नमुने पुणे येथील सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक, पशुसंवर्धन संशोधन सहसंचालक प्रयोगशाळा आणि सहायक संचालक पशुसंवर्धन या तीन प्रयोगशाळांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
हेही वाचा | बावनथडी नदीवरील सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पंप नादुरुस्तच!
कोठारातील धान्यसाठा महापुराच्या पाण्याखाली आल्याने तो पशु-पक्षी आणि मनुष्य यांच्या खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल पुण्यातील तिन्ही प्रयोगशाळांनी दिला. त्यानंतर सडलेल्या धान्यांची उचल करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या कुजलेल्या आणि दुर्गंधीयुक्त धान्यसाठ्याची विल्हेवाट लावण्याची परवानगी राज्य शासनाने संबंधित स्थानिक यंत्रणेला २३ ऑगस्टलाच दिली आहे.
“सडलेला धान्यसाठा हा सुमारे १ कोटी १८ लाखांचा असल्याने त्याच्या विल्हेवाटीसाठी राज्य शासनाची परवानगी घेणे गरजेचे होते. पुणे येथील प्रयोगशाळेने सदर धान्य खाण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारने हे धान्य उचलण्याची परवानगी २३ ऑगस्टला दिली आहे. सदर धान्य साकोली येथील कृषी विद्यापीठाला खत बनविण्यासाठी देण्यात येणार आहे”, अशी माहिती भंडारा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड यांनी दिली.
शेतकऱ्यांचे प्राधान्य स्थानिक बाजारांना; कृउबास, शासकीय संस्था नाराजीचे केंद्र!
> नुकसान झालेला धान्यसाठा किती?
तांदूळ २९९१.६८ क्विंटल, गहू १२२८ क्विंटल, साखर १४४.०३ क्विंटल, तूळ डाळ २०१.७२ क्विंटल, चना (हरभरा) डाळ १५५.५० क्विंटल, हरभरा ६.३२ क्विंटल असे एकूण ४ हजार ७२७.२५ क्विंटल धान्य यंतणेचे अपुरे नियोजन आणि अस्मानी संकटामुळे सडले आणि वाया गेले.
हा धान्यसाठा खाण्यायोग्य नसल्याने तो साकोली येथील कृषी विभागाला अखाद्य म्हणून खत बनविण्यास देण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यामुळे येत्या पंधरवड्यात हा वाया गेलेला धान्यसाठा कोठारातून उचलण्यात येणार आहे.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in