पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षांनंतर भारत-चीन यांच्यातील ताणाची स्थिती अजून वाढली आहे. चीनच्या या घडामोडींना विविध धोरणांची पार्श्वभूमी असल्याची चर्चाही होऊ लागली आहे. ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’वर (एलएसी) चीनकडून सुरु असणाऱ्या हालचाली या पूर्वनियोजित असून, त्या ‘तिबेट रणनितीची पाच बोटे‘ (Five Fingers of Tibet Strategy) या धोरणाचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. मग ही ‘फाईव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’ म्हणजे नेमकी काय? चला जाणून घेऊयात.
ब्रेनविश्लेषण | फाईव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षांनंतर भारत-चीन यांच्यात तणाव निवळण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत. दरम्यान, भारत आणि चीनदरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिबेटने भारताला सावधतेचा इशारा दिला आहे. तिबेटमध्ये जे झाले, त्यापासून भारताने शिकवण घ्यावी, असे तिबेटने म्हटले आहे. तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष लोबसांग सांगे यांनी एका मुलाखतीत बोलताना याबाबत भारताला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे‘वर (एलएसी) चीनकडून सुरु असणाऱ्या हालचाली या पूर्वनियोजित असून, या हालचाली म्हणजे चीनच्या ‘तिबेट रणनितीची पाच बोटे‘ (Five Fingers of Tibet Strategy) या धोरणाचा भाग असल्याचे सांगे यांनी म्हटले आहे. चीनने आखलेली ही डावपेच प्रणाली नक्की काय आहे, हेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत.
● तिबेट रणनितीची पाच बोटे
1940 मध्ये झालेल्या लाल क्रांतीनंतर चीनमध्ये माओ सर्वोच्च नेते म्हणून उदयास आले. ते नेहमी एखाद्या विशिष्ट रणनीतीबद्दल मोकळेपणाने बोलत असत व त्यावेळी कायमस्वरूपी आपला होईल, अशा उजव्या हाताचा उल्लेख करत असत. तसेच, तिबेट आणि तिबेटच्या आसपासचे भाग चीनी साम्राज्याचा भाग आहेत, असा विश्वासही ते वेळोवेळी व्यक्त करत.
दरम्यान, चीनने १९५० च्या दशकापासूनच शेजारच्या भागात आपला अधिकार आणि हक्क गाजवायला सुरुवात केली. आश्चर्याची बाब म्हणजे, एकेकाळी आशिया खंडातील सर्वात मोठे साम्राज्य असलेल्या मंगोलियावरही चीनने हक्क दाखवायला सुरुवात केली. त्यावेळी चीन आणि तिबेट हे दोन्ही प्रदेश मंगोलियाचे भाग होते, मात्र तिबेट हा कधीही चीनचा भाग नव्हता.
● पाच बोटांमधील तिबेट म्हणजे ‘तळवा’
माओच्या मते, तिबेट हा प्रदेश उजवा तळवा असून, हा चीनचाच भाग असावा. तसेच, उजव्या तळहाताशी जोडलेली बोटे म्हणजे सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, भूतान, नेपाळ आणि लडाख. १९५९मध्ये चीनने आपले सैन्य पाठवून उजवा हाताचा तळवा म्हणजेच तिबेट ताब्यात घेतला. मात्र जगभरातील कोणत्याही देशाने किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाने याला विरोध केला नाही.
दरम्यान, भारताने याला शांततापूर्ण मार्गाने विरोध केला. जर फक्त चीनला तिबेट ताब्यात घेण्यापासून
रोखले गेले असते, तर चीनला तिबेटच्या विस्तीर्ण भूभागावर हक्क सांगता आले नसते. त्यानंतर भारताने तिबेटचे अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांना भारतात आश्रय दिला. आपल्या समर्थकांसह ते भारतात पोहोचले, त्यामुळेच बऱ्याच वर्षांनंतरही तिबेटी लोक याठिकाणी शरणार्थी आहेत.
● पहिले बोट म्हणजे ‘सिक्कीम’
सिक्कीमचे भारतामध्ये १९७५ मध्ये विलीनीकरण झाले. त्यावेळी चीनने प्रचंड विरोध केला, पण त्याच्या विरोधाचा काहीही उपयोग झाला नाही. तथापि, आजतागायत सिक्कीम हा भारताचा अविभाज्य भाग आहे. परंतु, त्यानंतर चीनच्या सैन्याने सिक्कीमच्या सीमेवर अनेकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.
● दुसरे बोट अरुणाचल प्रदेश
चीनच्या रणनीतीत असलेले दुसरे बोट म्हणजे ‘अरुणाचल प्रदेश’, जिथे चीन सतत गोंधळ घालत आला आहे. १९६२ साली झालेल्या भारत- चीन युद्धात चीनने अरुणाचल प्रदेश चा मोठा भाग बळकावला. या भागाला ‘पूर्वोत्तर सीमांत क्षेत्र’ (NEFA : North East Frontier Agency) असेही संबोधले जाते. चीनकडे कोणताही ठोस पुरावा नसताना युद्धात बळकावलेला अरुणाचल प्रदेशचा हा त्यांचा असल्याचा दावा चीनने नेहमीच केला आहे.
दरम्यान, चीनने अनेकदा अरुणाचल प्रदेशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हाही एखादा भारतीय नेता या ठिकाणी जातो, त्यावेळी चीनने नेहमीच त्यांना विरोध केला आहे. तर दुसरीकडे, अरुणाचलच्या लोकांकडे भारतीय पासपोर्ट असतानाही चीन त्यांवर विश्वास ठेवत नाही. तसेच, अनेकदा अरुणाचल प्रदेशहून चीनकडे जाणाऱ्या लोकांना व्हिसाही दिला जात नाही. सोबतच, चीनचा ताबा असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या भागात मोक्याच्या ठिकाणी चीनने आपले सैन्यही तैनात केले आहे.
ब्रेनविश्लेषण : भारत-चीन सीमावाद ; नेमकं काय काय घडतंय ?
● रणनीतीतील तिसरे बोट नेपाळ, जे आता चीनच्या बाजूने आहे
चीनच्या ‘फाइव्ह फिंगर्स ऑफ तिबेट स्ट्रॅटजी’मधील तिसरे बोट आहे ‘नेपाळ’. ज्याप्रकारे चीनने तिबेटवर ताबा मिळवला त्या कारणाने नेपाळ फारच दुखावला गेला होता. त्यानंतर चीन हा नेपाळचा सर्वात मोठा शत्रू देश असल्याचे नेपाळने जाहीर केले होते. तथापि, चीनने नेहमीच नेपाळच्या मोठ्या क्षेत्रावर आपला दावा केला आहे, तर अनेकदा नेपाळने चीनच्या आक्रमणाच्या भीतीने भारताकडे लष्करी मदतही मागितली आहे.
भारताने गेल्या 70 वर्षांपासून नेपाळला सर्व प्रकारे मदत केली आहे. मात्र, तरीही नेपाळच्या कम्युनिस्ट सरकारने आता चीनच्या बाजूने जात भारताला आपला शत्रूदेश म्हणून घोषित करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, चीनच्या फाइव्हफिंगरच्या रणनीतीवर नेपाळने उचललेले हे पाऊल त्यांच्यासाठी किती धोकादायक आहे, याची नेपाळला किंचितही कल्पना नाही.
● चौथे बोट भूतान
भूतान हा भारताच्या पूर्वेकडील एक शांत आणि सुंदर देश आहे. भूतान ताब्यात घेणे हादेखील चीनच्या रणनीतीतील एक भाग आहे. चीनने बऱ्याच काळापासून यावर दावा केला असून, चीनला भूतानचा प्रदेश ताब्यात घ्यायचा आहे. यासाठी चीनने दीर्घ काळापासून या छोट्या देशासाठी फायदेशीर परदेशी गुंतवणूक आणि मदत करण्याचे आमिष दाखवले आहे. मात्र, भूतान या अमिषाला कधीही बळी पडला नाही, तर उलट भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये एक लष्करी करार झाला आहे. या कराराअंतर्गत भारतीय सैन्य भूतानच्या संरक्षणासाठी सहाय्य करणार आहे.
● पाचवे बोट म्हणजे ‘लडाख’
चीनच्या रणनीतीतील पाचवे बोट म्हणजे लडाख. लडाखवर चीन गेल्या कित्येक वर्षांपासून दावा करत असून, हा भाग ताब्यात घेण्यासाठी त्याने अनेकदा आक्रमणे केली आहेत. लडाखमधील अक्साई हा भाग एकेकाळी भारताचा भाग होता, मात्र चीनने केलेल्या आक्रमणामुळे आता हा भाग चीनच्या ताब्यात आहे. तर आता चीन गलवान खोऱ्यातून पुढे आला असून, चीनने गलवान खोऱ्यावर आपला दावा केला आहे. तसेच, चीनचे सैन्यही या ठिकाणी तहान मांडून बसले आहे.
◆◆◆
अशाच महत्त्वपूर्ण, ज्ञानवर्धक आणि विश्लेषणात्मक माहितीसाठी, बातम्यांसाठी व विविधांगी घडामोडी नियमित जाणून घेण्यासाठी आम्हाला ट्विटर व फेसबुकवर अनुसरून करा आणि आमच्या टेलिग्राम वाहिनीचे सदस्य व्हा !
Subscribe Our Channel : marathibraincom
तुम्हालाही तुमचे लिखाण किंवा साहित्य या व्यासपीठावर प्रकाशित करायचे असेल, तर आम्हाला लिहा/साहित्य पाठवा writeto@marathibrain.com वर.