ब्रेनवृत्त | भंडारा
प्रतिनिधी | अजय बर्वे
भंडारा जिल्ह्यातील नीलज बुद्रुक या गावातील एका सामान्य कुटंबातील मुलगा नीलेश रमेश बांते हा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व व मुख्य परीक्षा उत्तम गुणांनी पास झाला. त्याला मुलाखतीत बाजी मारून आई-वडिलांसोबत गावचे नाव मोठे करण्याचा आत्मविश्वास आहे. परंतु, काळाने घात केल्याने अपघातात त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे. तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, यातून त्याचा जीव वाचला, तरी त्याला मुलाखतीला मुकावे लागणार का? अशी समस्या निर्माण झाली आहे.
महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये मिळालेली चांगल्या पगाराची खासगी कंपनीतील नोकरी सोडून त्याने शासकीय सेवेत जाण्यासाठी त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा मार्ग निवडला. दिवसभर अभ्यासिकेत बसून अभ्यास व रात्री कॉल सेंटरमध्ये काम करून तो दिवस काढत होता. 2019 मध्ये तो गावातून एमपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणारा पहिला विद्यार्थी ठरला.
हेही वाचा : बावनथडी नदीवरील सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पंप नादुरुस्तच!
दसऱ्याच्या दिवशी निलेश व त्याचे सहा मित्र छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे देवीच्या दर्शनासाठी जाण्यास निघाले. परंतु रस्त्यात त्यांच्या वाहनाला मोठा अपघात झाला. यात एका मित्राचा मृत्यू झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यापैकी नीलेश रमेश बांते गंभीर जखमी झाला आहे. दुखापत झाल्याने त्याचे दोन्ही हात निष्क्रिय झाले आहेत. चेहऱ्यावरही गंभीर जखमा झाल्या आहेत. चार दिवसांपासून तो गोंदिया येथील खासगी रुग्णालयात सुन्न अवस्थेत खाटेवर पडून आहे.
नीलेशच्या वडिलांची परिस्थिती बेताची आहे. ते अल्पभूधारक शेतकरी असून, अंगात असलेल्या कलेमुळे गावागावात होणाऱ्या मंडई व जत्रांमध्ये तमाशाच्यां माध्यमातून कला सादर करतात व कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात.
आली! आली! एमपीएससीची नवी जाहिरात आली!
नीलेशच्या हातांना, खांद्यांना व तोंडाला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर सहा ते सात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एकीकडे, एवढा मोठा उपचाराचा खर्च कसा करावा? हा प्रश्न त्याच्या कुटुंबासमोर उभा आहे. अशात गावकरी व त्याचे मित्र या दुःखाच्या वेळी मदतीसाठी धावून आले आहेत. खरी माणुसकी दाखवत त्यांनी विविध माध्यमातून लोकांकडून पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे. दरम्यान दुसरीकडे, या सगळ्यातून बरा होऊन निलेशला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अंतिम, म्हणजेच मुलाखतीची फेरी देणे शक्य होईल की नाही, हाही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आमच्या टेलिग्राम वाहिनीत सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in