निकाल लवकर लावण्यासाठी एमपीएससीने केला महत्त्वाचा बदल!
मराठीब्रेन ऑनलाईन
ब्रेनवृत्त । मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरतीप्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि निकाल लवकर लावण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार परीक्षांच्या उत्तरतालिका संदर्भातील आक्षेप उमेदवारांना आता ऑनलाईन पद्धतीने सादर करणे शक्य होणार आहे. यामुळे उमेदवारांसमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे.
एमपीएससीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या भरतीप्रक्रियेसंदर्भात ‘तपासणी व संतुलन’ (चेक्स अँड बॅलन्सेस) पद्धतीचा वापर करून अनेक नवे बदल करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. सोबतच, बहुतांश परीक्षांच्या दोन उत्तरतालिका प्रकाशित करण्यात येतात, पण या संदर्भात असलेले आक्षेप फक्त ऑफलाईन पद्धतीनेच (पोस्टाद्वारे) नोंदवण्याचा पर्याय उमेदवारांकडे होता. मात्र आता यामुळे निकाल लावण्यास बराच वेळ लागतो हे आयोगाला आता कळले आहे. त्यामुळे आयोगाने ऑनलाईन पद्धतीचा पर्याय उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा । एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवार मुलाखतीला मुकणार??
“आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी याकरिता काही ‘चेक्स अँड बॅलन्सेस’ ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे”, असे आयोगाने म्हटले.
आयोगाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून, आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आयोगाने सांगितले आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल, असा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अंदाज आहे.
आमच्या टेलिग्राम वाहिनीत नक्की सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in