Site icon MarathiBrain.in

अनधिकृतच…!

काही दिवसांपूर्वी मी गोव्याला फिरण्यासाठी गेलो होतो. एका दुपारी हॉटेलमध्ये जेवण करत असताना बाजूच्या टेबलवर एक अमराठी व्यक्ती त्याच्या दोन मराठी मित्रांसोबत राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पाहत बसले होते आणि त्याबद्दल चर्चा करत होते. सहज कानावर पडलं म्हणून मग मीही ती चर्चा ऐकू लागलो.

प्रातिनिधिक छायाचित्र

त्यांचं संभाषण अनधिकृत झोपड्यांविषयीचे होते. त्यात अमराठी व्यक्ती इतर दोघांना म्हणत होती, ‘राज ठाकरे जे बोलत आहेत ते खरं आहे. माझेच काका मुंबईमध्ये राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांना अनधिकृत झोपडीमध्ये राहण्यासाठी म्हणून इथून नाशिकहून मुंबई ला नेण्यात आले.’

तो पुढे म्हणाला, ‘तिकडे नेऊन एका बिल्डरमार्फत त्यांनी अनधिकृत झोपडी बांधली. मुळात ही झोपडी बांधायला त्यांना तिथल्याच स्थानिक नगरसेवक, आमदार आणि अधिकाऱ्यांनी मदत केली. पुढच्या वर्षी त्या झोपडीवर त्यांनी अजून एक मजला चढवला. नंतर दोन वर्षांनी त्या झोपडीला आग लावण्यात आली.’ त्या आगीत त्यासारखा अनेक झोपड्या जळून गेल्या. नंतर सरकारने त्यांना मदत म्हणून ‘काही स्क्वेरफूट’चा फ्लॅट देऊ केला. त्यांनतर त्याच्या काकांच्या मुलाने दुसऱ्या ठिकाणी झोपडपट्टी बाधंली तिकडेही असंच झालं आणि आता त्याच्याकडे सुद्धा असाच फ्लॅट आहे.

आताच काही दिवसांपूर्वी त्याच्या मुंबईच्या काकांनी गावावरून त्याच्या दुसऱ्या छोट्या काकांना बोलावून घेतलं आहे. एका नवीन झोपडपट्टीमध्ये राहण्यासाठी. त्याचे काका फ्लॅटमध्ये राहून पाणीपुरीचा ठेला चालवतात, तर काकांचा मुलगा चायनीजची गाडी. नवीन आलेल्या काकांनी भाजीपाल्याचा धंदा सुरु केला आहे आणि काही वर्षांत त्यांच्याकडेही फ्लॅट असेल. त्या माणसाचे हे सर्व सांगणे ऐकून आम्हाला राहवलं नाही. माझ्या दादाने त्यांना प्रश्न केला, ‘तुम्हाला नाही बोलावलं त्यांनी मुंबईला?’

त्याने उत्तर दिलं की, ‘आम्ही पूर्वीपासून नाशिकलाच राहत होतो. माझ्या वडिलांची एक छोटी पानटपरी होती. तीच त्यांनी नंतर मोठं दुकान केलं. आम्हाला शिकवलं आणि चांगल्या नोकरीला लावलं, त्यामुळे हे असं करण्याचं आमच्या डोक्यात कधी आलं नाही. याउलट माझ्या बाबांनी काकांना गावावरून इकडे बोलावलं. तिथे दोन वर्ष राहिल्यावर त्यांना मुंबईला नेण्यात आलं.’

प्रातिनिधिक छायाचित्र

मी इथे राहतो आणि हा महाराष्ट्र माझा मानतो, त्यामुळे इथे होत असलेल्या प्रत्येक गैरकामांना माझा विरोधच आहे. जरी त्यात माझे नातेवाईक असले तरी हे चुकीचं आहे. या अनधिकृत बांधकामांना तिथलेच स्थानिक बिल्डर, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी खतपाणी घालत आहेत, असेही तो शेवटी म्हणाला.

माझ्या दृष्टीने याचंच एक उदाहरण द्यायचं झालं, तर ते नवी मुंबईचंच. नवी मुंबई म्हणजे आपल्या देशातील एक नियोजीत शहर, जे बनवताना पूर्णपणे प्लॅन करून बनवलेलं आहे. येथील छोटी छोटी गावं एकत्र करून बनवलेलं असं हे शहर. या शहरात फिरतांना एक गोष्ट चटकन लक्षात येईल, ती म्हणजे मुख्य गावाचा भाग आणि इतर भाग यामध्ये खूप तफावत आहे. मुख्य गावाच्या भागात फिरताना अनधिकृत बांधकामं, गच्च घरं, थोड्या प्रमाणात झोपडपट्टीचा भाग दिसेल. पण शहरातील इतर भाग मात्र पूर्णतः नियोजित दिसेल.

या तफावतीला मुख्य कारण आहे पैशाच्या लोभापायी येथील स्थानिक लोकांनी केलेली अनधिकृत बांधकामं. आता कार्यकर्ते व नेतेमंडळीपण येथीलच, मग त्यांच्या आशीर्वादाने आणि पालिकेतील अधिकाऱ्यांना पाठीशी घालून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. नेत्यांची यास साथ असते, कारण यामुळे त्यांना एकतर आर्थिक लाभ तर आहेच, पण त्याचसोबत हक्काची मतंसुद्धा मिळतात. यामुळे ही अनधिकृत बांधकामं वाढत जातात. झोपडपट्टी बनवणे आणि तिला आग लावणे, अन् मग सरकारकडून फुकटची काही स्क्वेअर फूटची घरं मिळवणे हेही त्यातच आलं.

काही नेते आणि अधिकारी चांगले असतात. ते ह्या अनधिकृत बांधकामांना विरोध करतात, पण कसंय, फायदा उठवणारे जास्त आणि विरोध करणारे कमी यामुळे ह्यांचा आवाज दाबला जातो. तुकाराम मुंढे (माजी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त) यांच्यासारखे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणारे काही अधिकारी असतात, पण मग सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन, दबाव आणून आणि आपलं राजकीय वजन वापरून या अधिकाऱ्यांना हटवून टाकतात.

यावरून आपल्याला अंदाज येईल की, अनधिकृत बांधकामचं चक्र कसं चालतं व त्यावर कारवाई का होत नाही? कारण या सर्वांमध्ये खालच्या माणसापासून ते वरच्या नेत्यांपर्यंतच्या लोकांचा राजकीय फायदा असतो. त्यामुळे अशा फायद्यासाठी नेते आणि अधिकारी आपली शहरे परप्रांतीयांच्या घशात घालत असतात. पण ह्या सगळ्याला आपलीच लोकं जबाबदार आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. इथे फक्त परप्रांतीयांना दोष देऊन चालणार नाहीच…!

 

लेख : अनिकेत पाटील

इमेल:- patilaniket444@gmail.com
ट्विटर:- @anii_ket www.anik8patil.wordpress.com

◆◆◆

( प्रस्तुत लेख लेखकाच्या हक्काधीन असून, इथे प्रकाशित होणाऱ्या विचारांशी आणि मतांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

 

विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Exit mobile version