राज ठाकरे यांना ईडीची नोटीस !

ब्रेनवृत्त | मुंबई

18 ऑगस्ट २०१९

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनुर मिल प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. येत्या २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज ठाकरे यांना देण्यात आले आहेत. राज यांना ईडीची नोटीस बजावली जाऊ शकते, अशी शक्यता अधिक व्यक्त करण्यात येत होती.

संग्रहीत छायाचित्र

कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कोहिनूर मिलच्या प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस ईडीने पाठवले आहे. २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे राज यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, मनसेचे प्रमुख नेते संदीप देशपांडे यांनी शासन पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. “मनसे अशा नोटिशींना घाबरत नाही. कोहिनूर मिलचे प्रकरण अतिशय जुने आहे. एवढी वर्ष झाल्यानंतर सरकारला आताच का जाग आली. सरकार आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे”, असे त्यांनी म्हटले आहे. सोबतच, लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या फोलपणाला उघडकीस आणण्याचे राज यांनी जोरदार कार्य केले, यामुळे शासनाने त्यांना नोटीस बजावली असल्याचा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे मंगळवारी ट्विटरकट्ट्यावर!

दरम्यान, राज ठाकरे ईडीच्या निशाण्यावर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांना या मुद्यावर उत्तर देताना राज म्हणाले होते की, “मला अद्याप कोणीही हॅलो करण्यासाठी आलेलं नाही. या सगळ्याबद्दल फक्त तुमच्याकडून मी बातम्या ऐकत आहे.”

प. बंगालमध्येही सीबीआयला ‘नो एन्ट्री’

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोरदार तयारी करीत असताना, राज यांना मिळालेल्या नोटीसमुळे राजकिय वातावरण अजूनच तापण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राज यांनी विविध महत्त्वाच्या मुद्यांना हात घालत शासनाच्या उणिवांना जनतेसमोर आणण्याची प्रभावी मोहीम सुरू केली आहे. येत्या २१ ऑगस्टला मुंबईत ईव्हीएम विरोधात सर्व पक्षीय मोर्चा आयोजित करण्याची घोषणा आली होती. राज ठाकरे यांनी नुकत्याच काही दिवसांआधी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांशी भेट घेतली होती व सोबतच, ईव्हीएम विरोधात भक्कम जनाधार उभा करण्यासाठी ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही भेटून आले आहेत.

 

◆◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: