टाम्पा (फ्लोरिडा) – सूर्य म्हणजे तेज अन् शक्ती, वसुंधरेच्या गर्भात प्राणतत्त्व ओतणाऱ्या या ताऱ्याने पृथ्वीला केवळ प्रकाशच दिला नाही तर तिला सौंदर्यही प्रदान केले. चंद्राशिवाय जशी रात्रीला शोभा नाही त्याचप्रमाणे सूर्याशिवाय दिवसही अस्तित्त्वहीन ठरतो. मागील अनेक शतकांपासून हा ऊर्जेचा चिरंजीव शक्तिपुंज संशोधक आणि अभ्यासकांना खुणावत होता. अखेर आज तो दिवस उगवलाच. यंदा मानव त्याच्या ऐतिहासिक चांद्रविजयाचा सूवर्ण महोत्सव साजरा करत असताना अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था “नासा’चे “पार्कर सोलर प्रोब’ हे मानवविरहीत अवकाश यान आज सूर्याच्या दिशेने झेपावले.
तांत्रिक बिघाडामुळे शनिवारी होणारे या यानाचे उड्डाण एक दिवस पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आज या प्रक्षेपणाला मुहूर्त मिळाला. सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्याबरोबरच त्याची छायाचित्रे टिपण्याचे काम देखील हे यान करणार आहे. सूर्याच्या वातावरणाला “करोना’ असे म्हणतात. ते सूर्याच्या पृष्ठभागापासून 6.16 दशलक्ष किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
याचा अभ्यास होणार
सौर वादळांची निर्मिती अन् सूर्याचे अंतरंग
पृथ्वीभोवतीच्या वातावरणांतील संभाव्य बदल
सूर्याची विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रे
करनोल प्लाझ्मा आणि विद्युतभारित कण
प्रक्षेपक : “युनायटेड लॉंच व्हेइकल’चे “डेल्टा आयव्ही रॉकेट’
प्रक्षेपणस्थळ : केप कॅनव्हरेल एअरफोर्स स्टेशन (अमेरिका)
प्रक्षेपणाची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 1 वाजून 1 मिनिट
कालावधी : सात वर्षांत 24 वेळा करोनाला प्रदक्षिणा
विशेष : अन्य यानांपेक्षा सातपटीने अधिक सूर्याच्या जवळ जाणार
सौजन्य: दैनिक सकाळ