Site icon MarathiBrain.in

माझी प्रगती काहींना खुपते : रामदास आठवले

मराठीब्रेन वृत्त

मुंबई, ९ डिसेंबर

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रथमच आपली जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझी प्रगती काही लोकांना बोचते, असे ते म्हणाले आहेत. संबंधित प्रकरणी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत.

मी लोकप्रिय असल्याने माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

रामदास आठवले म्हणाले, ‘मला धक्काबुक्की करण्यामागे कुणाचे षड्यंत्र असेल असे वाटत नाही, कारण विविध पक्षांतील लोक माझे मित्र आहेत. मात्र माझ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तिमागे नेमके कुणाचे हात आहेत? याची तपासणी होणे आवश्यक आहेत.’ मी लोकप्रिय नेता असल्याने माझ्या एखाद्या मुद्यावर नाराज होऊन माझ्यावर हल्ला करण्यात आला असेल. पण घटनास्थळी पोलिसांची हवी तेवढी सुरक्षा व्यवस्था नव्हती. यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही, ते म्हणाले.

दरम्यान, आठवले याच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आरपीआय कार्यकर्त्यांनी काल अंबरनाथमध्ये बंद पुकारला होता. यावेळी रिक्षा चालकांनी संपात सहभागी होणार नसल्याचे सांगितल्यावर वातावरणही थोडे तापले होते. त्यामुळे अंबरनाथमध्ये चौकाचौकात पोलीस बंदोबस्त करण्यात आले.

सोबतच, मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेला हल्ला हा पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे झाला असून, जोपर्यंत एसीपी आणि डीसीपी यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत आंदोलने सुरूच राहतील असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

औरंगाबाद येथे रिपाई कार्यकर्त्यांनी ‘रेल्वे थांबवा’ आंदोलन केले

दुसरीकडे, औरंगाबादमध्येही रिपाई कार्यकर्त्यांनी मनमाड-धर्माबाद एक्सप्रेस थांबवून ‘ट्रेन थांबवा’ आंदोलन केले.

 

◆◆◆

Exit mobile version