Site icon MarathiBrain.in

सत्तासंघर्षाच्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात ३०० शेतकरी आत्महत्या!

ब्रेनविश्लेषण | मुंबई


विधानसभेच्या निवडणुकीनंतर किमान एक महिना चाललेल्या सत्तासंघर्षानंतर राज्यात सत्तास्थापना झाली खरी, मात्र या काळात शेतकऱ्यांकडे पुरते दुर्लक्षच झाले. नोव्हेंबर, २०१९ च्या या काळात राज्यात तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या ४ वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील शेतकरी आत्महत्यांची ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, तर कुठे महापूर यामुळे सत्तास्थापनकाळातील नोव्हेंबर महिन्यात राज्यातील तब्बल ३०० शेतकऱ्यांनी स्वतःचे आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित एका वृत्तानुसार, गेल्या चार वर्षांतील शेतकरी आत्महत्यांची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. याआधी सन २०१५ च्या नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३००हून अधिक शेतकऱ्यांना आपले आयुष्य संपवावे लागले होते. ऑक्टोबर, २०१९ मध्ये १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर नोव्हेंबर महिन्यात यात ६१ टक्क्यांनी वाढ होऊन ३०० शेतकऱ्यांनी त्यांचे आयुष्य संपवले असल्याची माहिती राज्याच्या महसूल विभागाकडून प्राप्त झाली आहे.

हे माहीत आहे का? राज्यशासनाची ‘शेतकरी अपघात विमा योजना’

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाचा ‘वीस कलमी कार्यक्रम

ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे जवळपास ७० टक्के खरीप पिकांचे नुकसान झाले होते. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या शेतकरी आत्महत्यांमध्ये मराठवाड्यातील १२०, तर विदर्भातील ११२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील जवळपास १ कोटी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले असून, ही संख्या राज्यातील एकूण शेतकरी लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश इतकी आहे. यांपैकी, जवळपास ४४ टक्के प्रभावित शेतकरी हे मराठवाडा विभागातील आहेत.

राज्यात नोव्हेंबर, २०१९ या महिन्यात एकूण ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजप-शिवसेना यांच्यातील सत्तावाटपाचा तिढा आणि त्यानंतर जुळून आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या अनपेक्षित सत्ता समीकरणांच्या चढाओढीत शेतकरीवर्ग मात्र पुरता दुर्लक्षिला गेला. त्याचे परिणाम शेतकऱ्यांच्या आत्महत्येने दिसून आले.

हेही वाचा : मराठवाड्यात ११ महिन्यांत ८५५ शेतकरी आत्महत्या !

सत्तेसाठी शेतकऱ्यांना पेचात पाडू नका : शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

नोव्हेंबर, २०१९ मध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्या वगळता याच वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत स्वतःचे आयुष्य संपवणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या २,५३२ आहे. ही संख्या २०१८ या वर्षीच्या याच कालावधीतील शेतकरी आत्महत्यांच्या तुलनेने अधिक आहे. सन २०१८ मध्ये या कालावधीत शेतकरी आत्महत्येच्या २,५१८ घटना समोर आल्या होत्या.

दरम्यान, राज्य शासनातर्फे नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत ₹६,५५२ कोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नुकतीच, डिसेंबर महिन्यात नवागत महाविकास आघाडी शासनानेही कर्जमाफी जाहीर केली आहे. याआधीच्या भाजपच्या नेतृत्वाखालील शासनानेही २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली होती, ज्यातून तब्बल ₹१८,००० कोटी रुपयांचे एकूण ४४ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची तरतूद होती.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

 

Exit mobile version