परिषदेमार्फत गांधी विचारांवर एक वर्षाचा निवासी पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. मात्र विश्वस्त मंडळाने यावर्षीपासून संस्था कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
ब्रेनवृत्त प्रतिनिधी | वर्धा
शहरात स्थित ‘गांधी विचार परिषद’ बंद करू नये यासाठी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आज वर्ध्यात ठिकठिकाणी निदर्शने करत आपला विरोध प्रकट केला. ‘गांधी विचार परिषद’ ही एक नामांकित संस्था असून, गांधी विचारांचे संवर्धन आणि प्रसाराकरीता जगभरात ओळखली जाते. परिषदेमार्फत गांधी विचारांवर एक वर्षाचा निवासी पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. मात्र विश्वस्त मंडळाने यावर्षीपासून संस्था कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
आज विद्यार्थ्यांनी वर्धा येथील गांधी विचार परिषद, डाॅ. आंबेडकर पुतळा आणि सेवाग्राम आश्रमातील मुख्य प्रवेशद्वारासमोर आयोजित निषेध सभेत सहभागी होत #SaveIGSwardha असे लिहिलेले पोस्टर्स दाखवत विरोध नोंदवला. जगभरात पसरलेल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्याकडून मागील १४ दिवसांपासून संस्थेच्या बचावार्थ फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामसह अन्य समाजमाध्यमांवर मोहीमा चालविल्या जात आहे. “जोपर्यंत गांधी विचार परिषदेचे विश्वस्त ही संस्था पुर्वीच्या स्वरुपात पुन्हा सुरू होईल, असे लिखीत आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालू राहील”, असे आंदोलनकर्त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे.
यावर्षी ‘कोव्हिड-१९‘चे कारण देत संस्थेतला पदविका अभ्यासक्रम स्थगित करण्यात आला, तर मग त्याच ठिकाणी इतर संस्थाच्या विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी कशी दिली जात आहे? इतर संस्थाच्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही का? असे अनेक प्रश्न परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. गांधी विचार परिषदेच्या भविष्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, गांधी विचार परिषदेचे संचालक पडद्याआडून या संस्थेची सूत्रे इतरांच्या हाती सोपविण्यात मग्न आहेत. येथील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर इतरत्र बदल्या करण्यात आल्या असून याआधी त्यांच्यावर नोकरीचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला होता. सध्या या संस्थेतील दैनंदिन कामकाजही बंद आहे. या सर्व घडामोडी पाहता, येथील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत संस्थेचे काम बंद करुन परिषदेची जागा आणि इमारती इतर संस्थाकडे सोपविल्या जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
वाचा | अमेरिकेत चिनी दूतावाससमोर भारतीय अमेरिकी लोकांचे निदर्शन
संस्थेचे संचालक भरत महोदय इतर संस्थाशी संगनमत करुन गांधी विचार परिषद गिळंकृत करण्याचा डाव रचल्याचा आरोपही माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यासाठीचे पुरावे म्हणून समाजमाध्यमात संचालकांची पत्रेही विद्यार्थ्यांद्वारे व्हायरल केले गेले. दरम्यान, परिषदचे संचालक महोदय यांना या संदर्भात विचारलं असता त्यांना कुठलेही ठोस कारण किंवा स्पष्ट उत्तर देता आले नाही.