“ऑनलाइन शिक्षण. किती गोड वाटतं वाचायला ! परंतु ह्यामागे तोही विचार होणे खूप गरजेचे आहे, की एक बाप जो कसाबसा आपल्या संसाराचा गाडा लोटत असतो, तो आपल्या मुली-मुलाला स्मार्ट मोबाईल फोन घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करेल तरी कशी ?”
ब्रेनसाहित्य | लेख
सर्व सुज्ञ पालकांस प्रथमतः नमस्कार !
‘कोव्हिड-१९’ ह्या जागतिक साथरोगाच्या काळात गेल्या काही महिन्यांपासून आपण जीवन आवश्यक वस्तूंच्या खरेदीसह आपल्या घरातच थांबला आहात त्याबद्दल सर्वांत प्रथम तुमचं अभिनंदन.
या काळात पूर्वीपेक्षा सर्वात जास्त वेळ आपल्या कुटुंबास देता आला. दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्या आणि आता निकालपण जाहीर झाले. परंतु नर्सरीपासून तर नवव्या वर्गापर्यंत आणि विद्यापीठाच्यासुद्धा परीक्षा झाल्या नाही. तरीही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे जे पास झाले, त्यांचेही अभिनंदन! विद्यापीठाचे विद्यार्थीही बरेचं आनंदी झाले. कदाचित प्रत्येकवेळी असाच निकाल लागावा, असंसुद्धा कित्येकांच्या मोबाईलच्या स्टेटसवरून लक्षात आल. पण हे किती योग्य आहे याचा थोडा विचार विद्यार्थ्यांनीच करावा. शिक्षण म्हणजे फक्त पास होऊन पुढच्या वर्गात जाणे एवढंच का…?
दरवर्षी २६ जूनला राज्यातील सर्व शाळा सुरू होतात. परंतु ह्या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे त्या सुरू झाल्या नाहीत, हे सर्वांना माहिती आहेच. त्यामुळे आता शाळांचा नविन उपक्रम सुरू झाला आहे, तो म्हणजे ऑनलाइन शिक्षणाचा. ह्यामुळे शिक्षक शिकवतील आणि विद्यार्थ्यांना घरी बसून शिकता येईल. किती गोड वाटतं वाचायला! परंतु ह्यामागे तोही विचार होणे खूप गरजेचे आहे, की एक बाप जो कसाबसा आपल्या संसाराचा गाडा लोटत असतो, तो आपल्या मुली-मुलाला स्मार्ट मोबाईल फोन घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करेल तरी कशी?
तो करेलही व्याजाने पैसे काढून, पण खेड्यात नेटवर्क राहत का? तर अजिबात राहत नाही. समजा असेलही नेटवर्क, परंतु आपला पोरगा काही शिकतो आहे की तो इतर वाईट गोष्टींच्या आहारी गेला आहे, हे बाप कसं ओळखेल? आईबाबा दिवसभर शेतात जातात, काही आईवडील कदाचित व्यवसाय करत असतील आणि काही लहान मोठी नोकरी. पण पोराच्या हातात मोबाईल दिला असताना तो काय करतो हे त्यांना माहीत नसतं, हे खरं आहे.
वाचा मायबोली मराठीतील विविधांगी लिखाण : ब्रेनसाहित्य
‘स्मार्टफोन’ हा लहानसा (?) मोबाईल. ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आणि लहान मुलांचे तर सर्वात जास्त आवडते ‘गेम्स’. तसेच, मुले ऑनलाईन वर्ग करत असताना खेळतात अथवा काही इतर गोष्टी सर्च करतात शेअर करतात, सामाजिक माध्यमांवर काही अपलोड करतात ह्या बाबी दुर्लक्षित राहतात. तरीही, सध्या मोठ्या जोमात ऑनलाईन-ऑनलईन शिक्षणाचं बिगूल वाजने सुरू झाले आहे. तरी आपण मुलांच्या, भावाच्या, बहिणीच्या हातात स्मार्ट मोबाईल फोन दिला, तर ते त्याचा योग्यच वापर करत आहेत ना, याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवावे. तसेच, आपल्या आजूबाजूलासुद्धा काही विद्यार्थी असतील त्यांच्या मोबाईल फोनकडेही थोडं लक्ष असू द्या!
‘ऑनलाइन शिक्षण‘ वाईट नाही, परंतु स्मार्टफोनचा अयोग्य वापर वाईटच.
लेखक : तुषार भा. राऊत
ई-पत्ता : rautt9948@gmail.com
मो. नं. ८४०७९६३५०९
◆◆◆
(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)
Join @marathibraincom
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.