ब्रेनबिट्स । सागर बिसेन
बी. एस. येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आज बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते असलेले बोम्मई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि माजी मुख्यंमत्री येडीयुरप्पा यांच्या उपस्थितीत आज राजभवनात सकाळी ११ वाजता त्यांचा शपथविधी पार पडला.
वाचा । मोदी २.० पुनर्रचित मंत्रिमंडळ : कुणाला काय मिळाले?
बोम्मई यांनी आज सर्वप्रथम सकाळी बंगळुरू येथील भगवान श्री मारुती मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान व माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांची भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी बी. एस. येडीयुरप्पा यांच्या पाया पडून आशीर्वाद घेणारे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कोण आहेत हे जाणून घेऊया.
बसवराज बोम्मई बी. एस. येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात गृहमंत्री. मुख्यमंत्री पदाच्या मुख्य दावेदारांपैकी ते एक होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची शिफारस खुद्द येडीयुरप्पा यांनी केली होती आणि त्यांच्या या निर्णयाला करजोल अशोक ईश्वरप्पा व इतर भाजप आमदारांचा पाठींबा होता.
> मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्याबद्दल
- ६१ वर्षीय बसवराज बोम्मई हेसुद्धा बी. एस. येडीयुरप्पांप्रमाणे कर्नाटकातील वीरशैव-लिंगायत समुदायातील आहे. ते येडीयुरप्पांचे अतिशय विश्वासू सहकारी मानले जातात.
- शैक्षणिक पदवीने ते यांत्रिकी अभियंता (मेकॅनिकल इंजिनिअर) असून, त्यांनी त्यांच्या व्यवसायिक कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील टाटा मोटर्समध्ये (३ वर्षे) केली होती.
- सन २००८ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आणि तेव्हापासूनच त्यांचे पक्षातील पद उंचावत गेले.
- त्यांचे वडील एस. आर. बोम्मई हे सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री (सन १९८८-८९) होते.
- आधी त्यांनी कर्नाटक शासनात जलसंधारण विभागाचाही कार्यभार सांभाळला आहे. राज्यातील सिंचन प्रकल्पांविषयीच्या त्यांच्या ज्ञान आणि कामगिरीसाठी ते ओळखले जातात.
- येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते गृह, कायदा व संसदीय कार्यमंत्री होते.
- बसवराज हवेरी जिल्ह्यातील शिगाव विधानसभा क्षेत्रातून ३ वेळा विधानसभेवर व दोनदा विधानपरिषदेवर निवडून आले आहेत.
आमच्या टेलिग्राम वाहिनीचे मोफत सभासद व्हा : @marathibrainin
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.