Site icon MarathiBrain.in

नागरिकत्व कायदा म्हणजे सावरकरांचा अपमान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर, १५ डिसेंबर

नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जुना मित्रपक्ष भाजपवर टीका केली आहे. “नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांविरोधात आहे. हा सावरकरांचा अपमान आहे”, असे उद्धव ठाकरे काल नागपूरमध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत म्हणाले.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या भूमीला एक देश बनवणे, हे सावरकरांचे स्वप्न होते. परंतु भाजप सरकार सावरकरांच्या विचारांच्या विरोधात जाऊन सिंधू नदीजवळील आणि पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देत आहे. हा सावरकरांचा अपमान आहे. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष ज्या सावरकरांच्या विचारांवर बनला आहे, त्या सावरकरांना हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा मान्य झाला नसता. तसेच, नागरिकत्व कायद्याद्वारे देशाला भेडसावणाऱ्या अनेक मूलभूत मुद्यांवरून शासन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

सत्तेसाठी शेतकऱ्यांना पेचात पाडू नका : शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

दुसरीकडे, “राहुल गांधी यांच्या वक्तव्यासंबंधी शिवसेनेची भूमिका काय?” या परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी महाविकास आघाडी ही वेगवेगळ्या विचारांनी बनलेली आहे, मात्र सरकार म्हणून एकवाक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. “आम्ही (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहोत. आम्ही भिन्न विचारांची माणसं आहोत. त्यात कालही भिन्नता होती आणि आजही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची भूमिका शिवसेनेने मांडली आहे. मात्र, सरकार चालवण्यासाठी समान कार्यक्रम ठरवला आहे आणि शासन म्हणून आमच्यात एकवाक्यता आहे”, असे ते म्हणाले.

◆◆◆

Exit mobile version