Site icon MarathiBrain.in

ऑनलाइन व्यवहार अयशस्वी झालेल्यांना मिळणार दरदिवशी १०० रुपये

ब्रेनअर्थ | मुंबई

जर ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाला, तर कपात झालेली पूर्ण रक्कम परत (रिफंड) मिळेपर्यंत ग्राहकाला दरदिवशी शंभर रुपये मिळणार असल्याचे परिपत्रक भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केले आहे. यामुळे आता ऑनलाइन व्यवहार अयशस्वी झालं असेल, तरी ग्राहकांची चिंता कमी व्हायला मदत होणार आहे.

ऑनलाइन खरेदी-विक्री, तिकीट बुकिंग किंवा इतर कोणतेही व्यवहार करताना काही कारणास्तव व्यवहार अयशस्वी झाल्यास आता ग्राहकांना जास्त काळजी करण्याची गरज नाही. अयशस्वी व्यवहारात कपात झालेले पैैसे जर ग्राहकांना एक दिवसाच्या आत परत मिळाले नाहीत, तर ग्राहकांना दरदिवशी 100 रुपये मिळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. मात्र, बँकेने याविषयी काही अटीही नेमून दिलेल्या आहेत.

हे वाचलंत का? 

ATM ट्रान्झॅक्शन फेल अन पैसेही कट’ असे झाल्यास काय कराल?

आरबीआयने ऑनलाईन व्यवहार अयशस्वी झाल्यास तिच्या संबंधित टर्न अराउंड टाइम (टीएटी) नियमांत बदल केला आहे. यामुळे आता ग्राहकांना अयशस्वी व्यवहारात कपात झालेले पैसे परत मिळण्यासाठी जास्त दिवस वाट पाहावी लागणार नाही. बँकेने  जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार निश्चित वेळेत ग्राहकांना कपात झालेले पैसे परत न करणाऱ्या बँकांना दरदिवशी १०० रुपये दंड भरावा लागणार आहे. हे शंभर रुपये थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होतील. मात्र, संबंधित अयशस्वी झालेले ऑनलाइन व्यवहार हे UPI, IMPS, NACH द्वारे असावे, तेेव्हाच वरील नियम ग्राहकांना लागू होईल. सोबतच,  ग्राहकांना या नियमानुसार लाभ न मिळाल्यास ते आरबीआयकडे तक्रार करू शकतात. हा नियम 15 ऑक्टोबर 2019 पासून लागू होणार असल्याचे पत्रकात नमूद आहे.

विविध कर्ज रेपो रेटशी जोडण्यासाठी आरबीआयचे बँकांना आदेश

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अशा प्रकरणांची स्वत:हून दखल घेत ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होतील. बँकांना तक्रारीविना ग्राहकांना पैसे परत करावे लागतील. व्यवहार निष्फळ झाल्यानंतर बँकांसाठी ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा अवधी आरबीआयने निश्चित केला आहे. बँक खात्यातून पैसे कापले जात असतील किंवा एटीएममधून रोकड मिळत नसेल, तर अशा प्रकरणांत बँकेस ट्रान्झॅक्शनच्या पाच दिवसांच्या आत ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर दररोज 100 रुपये दंड बँकांना द्यावा लागेल. ही दंडाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात त्वरीत पोहोचायला हवी, ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट बँकांना पाहू नये, असेही आरबीआयने परिपत्रकात नमूद केले आहे.

 

◆◆◆

Exit mobile version