Site icon MarathiBrain.in

राज्यात मोफत आरोग्य सल्ल्यासाठी ‘ई-संजीवनी ओपीडी’ सुरू

ब्रेनवृत्त, मुंबई

राज्यात लॉकडाऊनच्या काळात अनेक खासगी दवाखाने बंद आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने ऑनलाईन स्वरूपात ‘ई-संजीवनी’ बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) सुरू केली आहे. ही सुविधा राज्यभरात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून, त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. राज्यशासनाने खासगी दवाखाने सुरु करण्यासाठी आवाहन केले असतानाही अनेक ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत. त्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने हा संयुक्त उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हा उपक्रम पूर्णपणे निशुल्क असणार आहे. मात्र, ही ऑनलाईन ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळातच उपलब्ध असणार आहे. तसेच, रविवारी ही सेवा उपलब्ध बंद असेल. टप्प्याटप्प्याने त्याची वेळ वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या सेवेसाठी राज्यातील नांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयांतील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यभर सर्वत्र ही सेवा सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे ४०० हून अधिक रुग्णांना या सेवेमार्फत उपचार देण्यात आले आहेत.

● या आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी काय कराल ?

– मोबाईल क्रमांकाद्वारे www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळावर नोंदणी  करून ओटीपी मिळवा.

– मोबाईल क्रमांकावर आलेल्या ‘ओटीपी’च्या मदतीने संबंधीत रुग्णाने/व्यक्तीने नोंदणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर टोकनसाठी विनंती करायची.

– तुम्हाला झालेल्या आजाराबाबत काही कागदपत्रे, रिपोर्ट असतील, तर ते अपलोड करा. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाचा ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होईल.

– लॉगइन करण्यासाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येईल. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकच्या आधारेही लॉगइन करता येईल.

– वेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टिवेट) होईल. त्यानंतर व्हिडिओ कॉल करता येईल.

◆◆◆

Exit mobile version