प्राणवायू तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एकही मृत्यू नाही!
ब्रेनवृत्त | मुंबई
कोव्हिड-१९ च्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूच्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एकही रुग्ण दगावले नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आज (बुधवारी) म्हणाले. सोबतच, राज्याने तसे प्रतिज्ञापत्रही मुंबई उच्च न्यायालयाकडे सादर केले असल्याचे यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोव्हिड-१९ मुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिशय आश्चर्यकारक माहिती जाहीर केली आहे. कोव्हिड-१९च्या लाटेत राज्यात एकाही रुग्णाचा प्राणवायू अभावी मृत्यू नाही, असे त्यांनी म्हटले आहे. एक वृत्तवाहिनीशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, “प्राणवायूच्या तुटवड्यामुळे राज्यात कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आम्ही कधीही म्हटले नाही. मृत्यू पावलेल्यांपैकी अनेकांना पूर्वीचे आजार आणि काहींना दीर्घकालीन व्याधी होत्या. याबाबत आम्ही उच्च न्यायालयालाही सांगितले आहे.”
विशेष म्हणजे, यंदाच २२ एप्रिल रोजी नाशिकच्या एका रुग्णालयात प्राणवायू संग्रहण केंद्रातील गळतीमुळे प्राणवायू पुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर २२ रुग्ण दगावले होते. त्यावेळी मंत्री टोपे यांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले होते.
वाचा | राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : विरोधकांच्या मुद्द्यांवर निर्णय घ्या!
दरम्यान, काल राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत सांगितले, की कोणत्याही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी दुसऱ्या लाटेत प्राणवायू अभावी दगावलेल्या रुग्णांची आकडेवारी सादर केलेली नाही. कोणत्याही राज्य व केंद्रशासित प्रदेशांत तशी नोंद करण्यात आलेली नाही. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात प्राणवायू अभावी कुणीही दगावले नसल्याचे म्हटले आहे.
No (COVID) patient died due to lack of oxygen in the state. We filed an affidavit to this effect in the court also. We had diverted 100% oxygen meant for industrial use for medical purposes: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/1VDqmfMGre
— ANI (@ANI) July 21, 2021
हेही वाचा | ‘कोव्हिड-१९’ म्हणजे चीनने दिलेली ‘वाईट भेटवस्तू’ !
दुसरीकडे, आजच दुपारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, की ज्या ज्या लोकांनी प्राणवायू तुटवड्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना गमावले आहे, त्यांनी संघ शासनाविरुद्ध न्यायालयात तक्रार करावी.
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in