Site icon MarathiBrain.in

ई-श्रम पोर्टलने गाठला १ कोटींचा टप्पा!

ब्रेनवृत | नवी दिल्ली


देशभरातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची माहिती संकलित करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर (e-Shram Portal) आतापर्यंत १ कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवण्यासाठी मागील वर्षी हे व्यासपीठ सुरू करण्यात आले होते.

ई-श्रम व्यासपीठावर नोंदणी करणाऱ्या कामगारांच्या संख्येने काल (रविवारी) १ कोटी ३ लाख १२ हजार ९५ चा आकडा पार केला. यांमध्ये ४३% महिला व ५७% पुरूष कामगारांचा समावेश आहे. आतापर्यंत पोर्टलवर नोंदणी केलेल्यांपैकी सर्वाधिक कामगार बिहार, ओडिशा, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील आहेत. दुसरीकडे, आकाराने लहान असलेली राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत कामगारांची संख्या तुलनेने कमी आहे.

२६ ऑगस्टपासून ई-श्रम व्यासपीठावर असंघटित कामगारांची नोंदणी करण्यासाठी देश पातळीवर विशेष मोहीम राबवली जात आहे. आधीच्या कालावधीच्या तुलनेत या मोहिमेत कामगारांच्या नोंदणीने विक्रमी आकडा गाठला आहे. दुसरीकडे, केरळ, उत्तराखंड, गुजरात, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, लडाख, जम्मू व काश्मीर आणि चंदीगड या राज्य व केंद्रशासित प्रदेशांत नोंदणी मोहिमेला अपेक्षित वेग मिळालेला नाही.

शेतकऱ्यांचे प्राधान्य स्थानिक बाजारांना; कृउबास, शासकीय संस्था नाराजीचे केंद्र!

● काय आहे ई-श्रम पोर्टल ?

ई-श्रम व्यासपीठ (e-Shram Portal) हे देशभरातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या माहितीचे संकलन करणारे इलेक्ट्रॉनिक व्यासपीठ आहे. बांधकाम, वस्त्रोद्योग, मासेमारी, नवोद्योग व व्यासपीठ कार्य, फेरीवाले, घरगुती कामे, शेती व संलग्न क्षेत्र तसेच दळणवळण अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या असंघटित कामगारांचा माहितीसंच (डेटाबेस) म्हणून हे व्यासपीठ कार्य करेल. 

सन २०१९-२० च्या आर्थिक पाहणीनुसार, देशात जवळपास ३८ कोटी लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे असंघटित क्षेत्रात काम करतात. ही शासकीय आकडेवारी असली, तरी वास्तविक आकडा यापेक्षा जास्तही असू शकेल. या सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद ई-श्रमवर होणे अपेक्षित आहे. सोबतच, आता स्थलांतरित कामगारही या व्यासपीठावर नोंदणी करून विविध सामाजिक सुरक्षा तसेच रोजगार आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in

Exit mobile version