Site icon MarathiBrain.in

वैश्विक भूक निर्देशांकच (GHI) चुकीचा : राज्यसभेत शासनाचा दावा!

प्रातिनिधिक छायाचित्र

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली 


भारताच्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, राज्यसभेत आज संघ शासनाद्वारे वैश्विक भूक निर्देशांकाबद्दल नकारात्मक दावा करण्यात आला आहे. वैश्विक भूक निर्देशांक (GHI : Global Hunger Index) भारताचे खरे चित्र दर्शवत नाही, असे शासनाने एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे.

वैश्विक भूक निर्देशांकाच्या अहवालात प्रकाशित भारताच्या स्थितीवरून पुन्हा एकदा संसदेत निर्देशांकाविरोधात टीकेचे सूर उमटले आहेत. “वैश्विक भूक निर्देशांक उपासमारी आणि पोषणाविषयी भारताचे खरे चित्र प्रदर्शित कारण हे निर्देशांकच भुकेचे चुकीच्या पद्धतीने मापन करते”, असा दावा अन्न व ग्राहक व्यवहार राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज राज्यसभेत केला. 

हेही वाचा । भारतात गंभीर उपासमारी कायम; भूक निर्देशांकात भारत १०१व्या स्थानी!

राज्यसभेत आज एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, “जीएचआयचे मापन अल्पपोषण, कुपोषण, मुलांच्या वाढीचे दर आणि बाल मृत्युदर या चार संकेतकांवर आधारित आहे. परंतु, याआधारे उपासमारीचे मापन करण्याची पद्धतच चुकीची असल्यामुळे, हा निर्देशांक भारताचे योग्य चित्रण करत नाही. येथील अल्पपोषण हे फक्त एकच मापदंड भुकेशी संबंधित आहे.”

त्यामुळे सामाजिक विकास आणि मदतीशी संबंधित असलेल्या आयर्लंडस्थित दोन जगविख्यात संस्थांचा अहवालच चुकीचा असून, भुकेचे मूल्यमापन चुकीच्या पद्धतीने केले जाते असा दावा त्यांनी केला आहे. 

कॉन्सर्न वर्ल्डवाईड आणि वेल्टहंगरलाईफ यांच्याद्वारे जाहीर करण्यात आलेल्या अलीकडच्या वैश्विक भूक निर्देशांक २०२१ च्या (GHI) अहवालात भारत ११६ देशांपैकी १०१ व्या क्रमांकावर आहे. याआधी २०२० च्या निर्देशांकात भारत २७.२० गुणांसह १०७ देशांपैकी ९४ व्या क्रमांकावर होता. दरम्यान, अहवालात दर्शविलेल्या भारताच्या स्थितीवर सत्ताधारी नेत्यांकडून टीका करण्यात आली असून, हा अहवाल चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version