Site icon MarathiBrain.in

शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अल्फा, बिटाशी लढण्यात असमर्थ!

ब्रेनवृत्त । पुणे


कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकार प्रतिक्रिया (Immune Response) व्यक्ती-व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते आणि ही प्रतिक्रिया विषाणूच्या उत्परिवर्तीत प्रकारांविरोधात (म्युटंट व्हेरियंट) कदाचित पुरेशी असणार नाही, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकार प्रतिक्रिया कोरोना विषाणूच्या अल्फा व बिटा प्रकाराशी लढू शकणार नाही असे या अभ्यासात म्हटले आहे. यामुळे, संबंधित अभ्यासातून कोव्हिड-१९ लस घेण्याच्या आवश्यकतेला समर्थन मिळाले आहे.

लिव्हरपूल, शेफफिल्ड, न्यूकॅसल आणि बर्मिंगहॅम विद्यापीठांच्या सहकाऱ्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना विषाणूचे नवे प्रकार व रोगप्रतिकार प्रतिक्रिया या संदर्भात एक संशोधन केले आहे. या अभ्यासातून असे दिसून आले, की ज्या व्यक्तींमध्ये विषाणूचे संक्रमण झाल्याच्या एक ते सहा महिन्यानंतर कमकुवत रोगप्रतिकार प्रतिक्रिया निर्माण होते, त्याच्यात ही प्रतिक्रिया कोरोना विषाणूच्या अल्फा व बीटा प्रकाराविरोधात प्रतिपिंडे तयार करू शकत नाही.

या अभ्यासानुसार, विशेषकरून नव्या प्रकारांमुळे उद्भवणाऱ्या कोव्हिड-१९ च्या दीर्घकालीन परिणामांपासून लोकांचे संरक्षण होईलच असे नाही. “एखाद्या व्यक्तीला होणारे संक्रमण लक्षण दर्शवणारे असो (symptomatic) वा नसो (asymptomatic), पण त्याच्या शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकार प्रतिक्रिया, विशेषकरून नव्या प्रकारांच्या संदर्भात कोव्हिड-१९ च्या दीर्घकालीन परिणामांपासून संरक्षण देईलच असे नाही.”

या संशोधनातून कोव्हिड-१९ ची लस घेण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील क्रिस्टिना डॉड म्हणतात, “आम्ही केलेला संबंधित अभ्यास हा लक्षण असणाऱ्या व नसणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या संक्रमित रुग्णांच्या रोगप्रतिकार प्रतिक्रियेचा सर्वसमावेशक तपशील आहे.  जरी तुम्हाला आधीच कोव्हिड-१९ होऊन गेला आहे असे वाटत असले, तरी जेव्हाही उपलब्ध होईल तेव्हा आपण सर्वांनी कोव्हिडची लस घेणे अतिशय महत्वाचे आहे. ”

वाचा । कोव्हिड-१९ तपासणी अहवाल थेट रुग्णांना द्या : सर्वोच्च न्यायालयाचे राज्याला आदेश

कशी होती अभ्यासपद्धती ? 

“लक्षण दिसणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांशांमध्ये संक्रमणाच्या सहा महिन्यांनंतर मोजण्याजोगी रोगप्रतिकार प्रतिक्रिया आढळून आली, तर खूप थोड्या (२६%) रुग्णांमध्ये ती दिसून आली नाही. दुसरीकडे, ज्या लक्षणे न दिसणाऱ्यांपैकी बहुतांश रुग्णांमध्ये (९२%) रोगप्रतिकार प्रतिक्रिया आढळून आली नाही”, असे संशोधकांनी सांगितले.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Exit mobile version