मराठीब्रेन ऑनलाईन
ब्रेनवृत्त | ईलात (इस्राईल)
२१ वर्षीय भारतीय अभिनेत्री व मॉडेल हरनाझ संधूने (Harnaaz Sandhu) जगभरातील प्रतिष्ठित असा यंदाचा ‘मिस युनिव्हर्स २०२१’ (Miss Universe 2021) सन्मान मिळवला आहे. तब्बल ८० देशांतील प्रतिस्पर्धी सुंदरींना मागे टाकत सिंधूने हा सन्मान जिंकला आहे.
इस्राईलच्या ईलात (Eilat) शहरात मिस युनिव्हर्स स्पर्धेचे ७०वे सत्र नुकतेच पार पडले आहे. या स्पर्धेत भारताची सुंदरी-अभिनेत्री हरनाझ सिंधूने यंदाच्या मिस युनिव्हर्स २०२१ सन्मानावर बाजी मारली आहे. यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय मॉडेलला मिस युनिव्हर्सचा सन्मान जाहीर झाला आहे.
वाचा | अंजु बॉबी जॉर्जची लांब उडी; ठरली ‘वुमन ऑफ द इयर’!
याआधी, दोन भारतीय अभिनेत्रींनी हा सन्मान पटकावला होता. सन २००० मध्ये अभिनेत्री लारा दत्ता व १९९४मध्ये सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स ठरल्या होत्या. लोक प्रशासन विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या चंदीगडच्या हरनाझला गत वर्षीची मेक्सिकोची मिस युनिव्हर्स अँड्रिया मेझा हिने मिस युनिव्हर्सचे मुकुट बहाल केले.
सन १९५२पासून दरवर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन केले जाते. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन या संघटनेद्वारे ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाच्या स्पर्धेत पॅराग्वेच्या नादिया फेररैरा हिने दुसरा, तर दक्षिण आफ्रिकेच्या लालेला मस्वानेने तिसरा क्रमांक पटकावला.
सन २०१७ मध्ये टाईम्स फ्रेश फेस (Times Fresh Face) हा सन्मान मिळाल्यानंतर हरनाजने मिस युनिव्हर्स स्पर्धेचा प्रवास सुरु केला. त्यावेळी ती १७ वर्षांची होती. त्यानंतर तिने २०२१ चा लिव्हा मिस दिवा युनिव्हर्स (LIVA Miss Diva Universe) हा सन्मान जिंकला.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in