Site icon MarathiBrain.in

ट्विटरकरांचे पुणे ‘ट्विटप’ उत्साहात संपन्न !

मराठी ट्विटरकरांचा स्नेहमेळावा, म्हणजेच ‘ट्विटप’ काल पुण्यातील सारसबागेत उत्साहात पार पडले. मराठी अभिमान गीत गायनाने व प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन मराठी ट्विटरकरांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मराठीब्रेन वृत्त

पुणे, २६ जानेवारी

जेव्हा आपण एकजुटीने, आपुलकीने आणि बहुतेकांची एकमेकांशी परस्पर अशी ओळख नसतानाही समाजमाध्यमांवर आपलेपणाने आणि स्नेहभावाने वागतो, तेव्हा ते समाजमाध्यम फक्त एक माध्यम राहत नाही. तर ते एक कुटुंब होऊन जातं. असंच काहीसं ट्विटर या बहुचर्चित समाजमाध्यमावरील मराठी ट्विटरकरांचं. महाराष्ट्राच्या विविध भागातून एकत्र येऊन काल मराठी ट्विटरकरांनी शहरातील सारसबागेत पुणे ‘ट्विटप २०१९’ हा स्नेहमेळावा आनंदात पार पाडला.

राज्याच्या विविध भागांतून ट्विटपसाठी ट्विटरकरांनी उपस्थिती दर्शवली.

ट्विटर या समाजमाध्यमावर ‘मायबोली मराठी’ भाषेत आपल्या विचारांची व ललित साहित्याची देवाणघेवाण करणाऱ्या ट्विटरकरांचे एक स्वतःचे विश्व तयार झाले आहे. कुणालाही प्रत्यक्ष न भेटलेले किंवा ओळखीची कोणतीही पूर्ववत पार्श्वभूमी नसलेले हे मराठी ट्विटरकर दरदिवशी ट्विटच्या माध्यमातून एकमेकांशी भेटत असतात. मात्र, ही ओळख फक्त आभासी जगापर्यंतच मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष भेटीगाठीचे क्षणही मराठी ट्विटरकर सोडत नाहीत. याचंच एक भाग म्हणून, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ट्विटरकरांनी पुण्याच्या सारबागेत काल ‘ट्विटप २०१९’ चे आयोजन केले होते. मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ट्विटपचे हे ‘तिसरे’ सत्र होते. याआधी मराठी ट्विटरकरांचे दोन ट्विटप अनुक्रमे पुण्यात आणि मुंबईत आयोजित करण्यात आले होते. त्यातही ट्विटरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठीचा ट्विटर स्नेहमेळावा उत्साहात पार पाडला होता.

ट्विटपच्या निमित्ताने विविध विषयांवर चर्चसत्र आयोजित करण्यात आले होते.

राज्याच्या विविध भागांतून आलेले ट्विटरकर ट्विटपमध्ये सहभागी झाले होते. या स्नेहमेळाव्यात मोठ्या प्रमाणात ट्विटरकरांनी सहभाग घेतला. यामध्ये साहित्य, अभियांत्रिकी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण, गडकिल्ले संवर्धन, कलाविश्व, पत्रकारिता व इतर, अशा विविध क्षेत्रांत वावरणाऱ्या ट्विटरकरांचा समावेश होता. सुरुवातीला सर्वांनी एकमेकांची ओळख जाणून घेतली. त्यानंतर विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चसत्रांत ट्विटरकरांनी त्यांचे मत व्यक्त केले व मराठी भाषेत समाजमाध्यमांवर कशी भर घालता येईल, त्यासाठी काय अजून योगदान देता येईल, यावरही चर्चा झाल्या. यामध्ये समाज माध्यमाचे फायदे-तोटे, गडकिल्ले संवर्धन, समाजमाध्यमांतून समाजकारण व इतर विषयांचा समावेश होता.

पुणे ‘ट्विटप २०१९’ मध्ये आयोजित चर्चासत्र सोबतच ‘मराठी अभिमान गीतगायन’ व ‘राष्ट्रगीत’ गायन हे सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ट्विटरकरांसह बागेत आलेल्या सर्वांनी राष्ट्रगीत गायनाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
‘ट्विटप २०१९’ निमित्ताने ट्विटरकरांनी सामूहिकरीत्या मराठी अभिमान गीताचे गायन केले.

मराठी भाषेचा अभिमान म्हणून ट्विटपसाठी जमलेल्या सर्व ट्विटरकरांनी मराठी अभिमान गीताचे गायन केले. तर ट्विटपची सांगता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायनाने झाली. सारसबागेसारख्या परिसरात जो तो आपल्या गप्पांत रंगलेला असतानाही राष्ट्रगीताच्या वेळी सर्वांनी यथोचित आदरार्थक प्रतिसाद दिला. यामुळे ट्विटप अजूनच सार्थक ठरले.

ट्विटपविषयी मनोगत व्यक्त करताना सहभागी ट्विटरकरांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले, काहींनी ट्विटरवर आल्यानंतरचे परिवर्तन व मराठी ट्विटरकरांविषयी सांगितले. तर काहींनी समाजमाध्यमावरील काही गोष्टींना किती वाव द्यावा आणि किती नाही, यावरही एकमेकांना मार्गदर्शन केले. दुसरीकडे, ट्विटप हे वर्षातून फक्त एकदा न होता, पुन्हा पुन्हा होत जावे अशी अपेक्षा ट्विटरकरांनी व्यक्त केली आहे. मराठी ट्विटरकर नित्यानंदा जोशी म्हणाल्या की, ‘आम्ही ट्विटपची आतुरतेने वाट बघत असतो. खरंतर, ट्विटप हे वर्षातून फक्त एक-दोनदा न होता, किमान दर तीन महिन्यांत तरी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित व्हायला हवे. यामुळे इतरांशी ओळख आणि संपर्क वाढण्यास अजून मदत होईल.’

हेमंत आठल्ये यांनी मराठी भाषेचा आग्रह, मराठी पाट्या याबद्दल मनोगत व्यक्त केले, तर डॉ.विजय गोकुले यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. ट्विटपला उपस्थित नाशिकचे उद्योजक अभिजित औताडे यांनी ट्विटरकरांना निर्भीडपणे व्यक्त होण्याचे आवाहन करतानाच, नाशिकमध्ये लवकरच ट्विटप आयोजित करण्याचा मानस बोलून दाखवला. औक्षवंत पाटील यांनी खास ट्विपचे पोश्टर बनवून आणले होते. या व्यतिरिक्त ट्विटपला उपस्थित किरण जाधव, रोहित बापट व इतरांची छान विचार मांडले. डिस्कवर महाराष्ट्रचे अजिंक्य निंबाळकर , सह्याद्री प्रतिष्ठानच्या जीवन सातपुते यांनी गड किल्ले यासंदर्भातील कामांची माहिती दिली. जेष्ठ ट्विटरकर अशोक भेके यांनी सकारात्मक विचार मांडण्याचे आवाहन केले. ट्विटपसाठी आलेले पिनुभाऊ शिंदे यांनी लवकरच औरंगाबाद ट्विटप करू असे जाहीर केले.

ट्विटरवरील वस्तुनिष्ठ मराठी खाते मराठी ब्रेन, मराठी रिट्विट, हॅशटॅग मराठी, मराठी विश्व यांसह मराठी ट्विटरकरांनी एकत्र येण्यासाठी सर्वांना आवाहन केले होते. यास सकारात्मक प्रतिसाद देत मोठया प्रमाणात ट्विटरवर्ग सारसबागेत जमला होता. सोबतच, मराठी विश्वपैलू या ट्विटर खात्यावरून ‘ट्विटप’चे थेट (Live) प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी सर्व मराठी हॅंडलच्यावतीने मराठी विश्वपैलूच्या गोपाल मदने तसेच महत्वाची भूमिका पार पडणार्‍या तुषार खरे आणि सुनिल थोरात यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले व यापुढे राज्यातील विविध ठिकाणी असेच ट्विटप आयोजित होत राहो, अशा आशा सर्वांनी व्यक्त केली.

◆◆◆

Exit mobile version