मायक्रोसॉफ्टने तिची चीनमधील लिंक्डइन (LinkedIn) सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने ७ वर्षांपूर्वी चीनमध्ये लिंक्डइन सेवा सुरु केली होती आणि ते सद्या चीनमधील अमेरिकी मालकी असलेले शेवटचे मोठे समाजमाध्यम होते.
मराठीब्रेन ऑनलाईन
ब्रेनवृत्त । सागर बिसेन
संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रणी असलेल्या मायक्रोसॉफ्टने तिची चीनमधील लिंक्डइन (LinkedIn) सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या प्रशासनाने इंटरनेट क्षेत्रातील नियंत्रण अधिक कठोर केल्यामुळे मायक्रोसॉफ्टने हा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने ७ वर्षांपूर्वी चीनमध्ये लिंक्डइन सेवा सुरु केली होती आणि ते सद्या चीनमधील अमेरिकी मालकी असलेले शेवटचे मोठे समाजमाध्यम होते.
लिंक्डइनने गुरुवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे, की ते या वर्षाच्या अखेरीस स्वतःचे मुख्य व्यासपीठ चीनमधून काढून टाकेल व त्याऐवजी अगदी साधी अशी “इनजॉब्स” (InJobs) नावाची सेवा तेवढी सुरु ठेवेल. ही सेवा फक्त नोकऱ्यांवर लक्ष केंद्रित करेल. या सेवेत सामाजिक फीड किंवा सामायिक करण्याचे (शेअर) पर्याय समाविष्ट नसतील.
“एकीकडे चीनी नागरिकांना नोकऱ्या आणि आर्थिक संधी शोधण्यात मदत करण्यात आम्हाला यश मिळाले असले, तरी सामायिकरण आणि माहिती प्रसारण यांसारख्या सामाजिक पैलूंमध्ये आम्हाला तेवढे यश मिळाले नाही”, असे लिंक्डइनने म्हटले आहे. सोबतच, “चीनमध्ये आम्हाला अधिक आव्हानात्मक कार्यात्मक वातावरण आणि अनुपालन आवश्यकतांचा सामना करावा लागत आहे”, असेही लिंक्डइनने म्हटले आहे.
हेही वाचा । आता तुमच्या ट्विटवरील संभाषणातही दिसणार जाहिराती
चीनमधील लिंक्डइनच्या हालचाली जवळून पाहिल्यानंतर कळते, की एखाद्या देशात असलेल्या आंतरजाल (इंटरनेट) विषयक कडक नियमांमध्ये एक पश्चिमात्य समाजमाध्यम किती तग धरू शकते. चीनमध्ये ट्विटर (TWTR.N), फेसबुक (FB.O) आणि अल्फाबेट इनकॉर्पोरेटेडचे गुगल ( GOOGL.O) व युट्युब यांवर आधीच बंदी आणण्यात आली आहे.
सन 2014 मध्ये लिंक्डइन चीनमध्ये आले होते. त्यावेळी कंपनीने हे मान्य केले होते, की चीनच्या नियमांचे पालन म्हणून तिच्या वेबसाइटवर वापरकर्त्यानी पोस्ट केलेल्या काही सामग्री तिला काढत राहाव्या लागतील, म्हणजेच ‘सेन्सॉर’ कराव्या लागतील.
दरम्यान, गेल्या वर्षी चीनने केलेल्या मोठ्या प्रमाणावरील कारवाईचा फटका लिंक्डइनला बसला. या कारवाई अंतर्गत चीनने आंतरजाल कंपन्यांवर त्यांच्या संकेतस्थळांवर प्रकाशित होणाऱ्या सामग्रीपासून तर ग्राहकांच्या गोपनीयतेपर्यंतच्या विषयांवर नवे आणि कडक निर्बंध लादले आहेत. त्यावेळी चीनने आग्रही भूमिका घेत असेही म्हटले होते, की देशात सुरु असणारे आंतरजाल व्यासपीठ हे मूळ समाजवादी मूल्यांना अधिक सक्रियपणे प्रोत्साहन देणारे असावेत.
फ्रान्सने गुगलवर ठोठावला ५०० दशलक्ष युरोंचा दंड!
त्यानंतर, मार्चमध्ये लिंक्डइनने चीनमधील वापरकर्त्यांसाठी नवीन साइन-अप थांबवले आणि आम्ही चिनी कायद्यांचे पालन करण्यावर काम असल्याचे सांगितले. पुढे दोन महिन्यांनंतर चीनच्या सर्वोच्च इंटरनेट नियामकाने तब्बल 105 आंतरजाल व्यासपीठांवर बेकायदेशीरपणे वैयक्तिक माहिती गोळा करून ती वापरल्याचा आरोप केला आणि त्यांना सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. यांमध्ये लिंक्डइनचाही समावेश होता.
सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in