पर्यावरण व नैसर्गिक अन्नसाखळीसाठी अतिशय महत्त्वाची असलेली ‘गिधाड’ पक्ष्यांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर. या ‘स्वच्छतादूत’ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक पातळीपासून प्रयत्न करणे खूप गरजेचे झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून ‘गिधाड’ पक्षी नजरेस पडू लागली आहे. याविषयीच वाचा सविस्तर…
ब्रेनविशेष | अनुराधा धावडे
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या व संवर्धनाच्या धोकादायक स्थितीत पोहचलेल्या गिधाड पक्षी एरवी नजरेस पडत नाहीत. निसर्गाचा ‘स्वच्छतादूत’ असलेले हे पक्षी काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी ‘गिधाड पक्षी’ नरजेस पडू लागले आहेत. अशात, लांब चोचीच्या ५० ते ६० गिधाडांनी नाशिकच्या म्हसरूळ वन विभागाच्या ‘वनराई’मध्ये नुकतीच दोन दिवसांपूर्वी हजेरी लावली असल्याचे वृत्त आहे. एवढंच नव्हे, तर गिधाडांच्या या थव्याने तासाभरपेक्षा जास्त वेळ इथे विसावा घेतल्याचे व हीच संधी साधत त्यांची छायाचित्रे अचूकरित्या टिपली असल्याचेही वनराईचे सुरक्षारक्षक कुमार यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथेही नुकतेच ‘लांब चोचीचे भारतीय गिधाड’ आढळले आहे. याविषयीची नोंद ‘वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थे’चे सचिव शिवाजी बळी व संतोष शेटे यांनी केली आहे. १९९० नंतर मालेगाव तालुक्यातून गिधाडे दिसेनासे झाल्याची माहिती जाणकार सांगतात. त्यामुळे नुकतीच गिधाडांच्या आगमनाची झालेली नोंद जिल्ह्याची जैवविविधता संपन्न असल्याची बाब दर्शवीत आहे.
गडमाता देवराईचे संवर्धन, मात्र बाजूची टेकडी वृक्षहीनच !
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची रस्त्यांवरील कमी झालेली वर्दळ, वाहनांचा थांबलेला गोंगाट यांमुळे वन्यजीव शहराजवळ नजरेस पडू लागले आहे. सहसा नजरेस न पडणारी गिधाडे शहराच्याजवळ चांगल्या संख्येने दिसून येणे, हे शहराची नैसर्गिक अन्नसाखळी विकसित होण्याच्या दृष्टीने चांगले मानले जाते. नाशिकमधील खोरीपाडा डोंगराच्या या वनराईत सुमारे २०० पेक्षा अधिक गिधाडे आढळून यायची. यामध्ये पांढऱ्या पाठीची व लांब चोचीची या दोन प्रजाती प्रामुख्याने आहेत. मात्र गेल्या काही वर्षात शहराच्या वेशीवर कोठेही गिधाडे पहावयास मिळाली नव्हती. मागील काही वर्षांत या गिधाडांनी शहराच्या वेशीपासून आपले स्थलांतर ग्रामीण भागात केले आहे. तर अंजनेरी, ब्रह्मगिरी, हरसुल, वाघेरा घाट आणि खोरीपाडा या भागांवर गिधाडांचे वास्तव्य पाहावयास मिळते.
● गिधाड : अन्न साखळीतील महत्वाचा दुवा
‘गिधाड’ (Vulture) हे पक्षी निसर्गातल्या अन्नसाखळीचे महत्त्वाचे घटक आहे. गिधाडे ‘मृतभक्षक वर्गा’तील (Carnivorous) पक्षी असून त्यांचे मुख्य खाद्य हे मृत प्राण्याचे मांस असते. त्यामुळेच त्यांना पृथ्वीचे ‘स्वच्छतादूत’ म्हटले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतातून गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पाळीव जनावरांना दिल्या जाणाऱ्या औषधातील ‘डायक्लोफिनॅक’ हे रासायनिक द्रव्य. पाळीव जनावरे मेल्यानंतरही त्यांच्या शरीरात हे द्रव्य कायम राहते. परिणामी, हे मृत प्राणी खाल्यावर हे रसायन गिधाडांच्या शरीरात गेल्याने त्याचा दुष्परिणाम गिधाडांच्या यकृत, मूत्रपिंड यांवर होतो आणि हे पक्षी मरून पडत असत. अचानक सगळीकडे हे घडल्याने गेल्या काही वर्षात सुमारे ९७ टक्के गिधाड पक्षी नष्ट झाले आहेत. मात्र आता ‘डायक्लोफेनॅक’ हे औषध प्रतिबंधित करण्यात आले आहे.
● भारतात गिधाड पक्ष्यांची स्थिती
जगभरात गिधाडांच्या तब्बल २३ प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. यांपैकी मुख्यतः भारतात ७ प्रजातीची गिधाडे आढळून येतात. यांमध्ये पांढऱ्या पाठीचे गिधाड, राज गिधाड (लाल डोक्याचे गिधाड), युरेशियन ग्रिफॉन (करडे गिधाड), हिमालयीन ग्रिफॉन (करडे गिधाड), पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड), आणि काळे गिधाड (सिनेरियस गिधाड) आणि लांब चोचीचे गिधाड समाविष्ट आहेत.
भारताच्या वन्यजीव (सरंक्षण) कायदाच्या नुसार देशात गिधाड या पक्ष्यांची नोंद संरक्षणाच्या दृष्टीने अधिक गंभीर्याच्या ‘परिशिष्ट १’ मध्ये करण्यात आली आहे. तर, ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर्स (आययूसीएन)’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा पक्षी ‘नष्टप्राय’ होत असल्याचे घोषित केले आहे.
● प्रजातीनुसार गिधाडांची वैशिष्ट्ये
– ‘हिमालयन ग्रिफोन’ हे जवळ जवळ १० ते १२ किलो वजनाची असतात.
– ‘श्वेत पाठीची गिधाडे’ ही चार ते पाच किलो वजनाची असतात. एकदा जेवण मिळाल्यानंतर ते १५ ते २० दिवस उपाशी राहू शकतात. एकदा जेवण मिळाले की आपल्या गळ्यातल्या पिशवीत दोन किलोपर्यंत खाद्य साठवून ठेवतात.
– ‘इजिप्शियन’ प्रकारची ची गिधाडे ’जिप्स कल्चर’ने सोडलेले छोटे मांसाचे तुकडे, कुत्र्याची आणि इतर प्राण्यांची विष्ठा खाऊन परिसर स्वच्छ ठेवतात.
– ‘राज गिधाडे’ हे शवाचा ’कडक’ भाग म्हणजेच चामडी, स्नायू आणि अस्थिबंध खाऊन मेलेल्या प्राण्यांचा पुरेपूर वापर करून परिसर स्वच्छ ठेवतात. राज गिधाडे आणि इजिप्शियन गिधाडे संधी मिळाल्यावर छोट्या प्राण्यांना मारून खातात. ही कृत्ती जिप्स गिधाडामध्ये आढळत नाही.
– ‘दाढीवाले गिधाड’ हे डोंगराळ भागात राहून मृत जनावरांची हाडे खाते. ही गिधाडे हाडे उंचावरून टाकून दगडावर आपटतात आणि नंतर फुटलेल्या हाडातील मगज, छोटे हाडांचे तुकडे खातात.
हेही वाचा : समुद्री माशांमध्ये प्लास्टिकचे अंश ; ‘टेरी’चे विशेष अभियान !
● गिधाड संवर्धनासाठी जागतिक पाऊल
नैसर्गिक अन्नसाखळीतील या महत्त्वाच्या घटकाचे संवर्धन व्हावे, त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती घडून यावी, या उद्देशाने दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी ‘जागतिक गिधाड संवर्धन दिन‘ साजरा केला जातो. जैवविविधतेतील गिधाड ही प्रजात नष्ट झाल्यास निसर्गावर त्याचा परिणाम नेमका कशा पद्धतीने होईल हे काळच ठरवेल. त्यामुळे गिधाडांना केवळ निसर्ग अभ्यासकांनी किंवा सरकारने प्रयत्न करून वाचवण्याऐवजी समाजातील सर्व घटकांनी एकत्र प्रयत्न करून त्यांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच निसर्गाचा समतोल राखला जाईल व आपल्या अधिवासाचे संरक्षण होऊ शकेल.
◆◆◆