रेल्वे निघाली घेऊन पाणी, चेन्नईत पाणीबाणी !

ब्रेनविशेष | सागर बिसेन (@sbisensagar)

१२ जुलै २०१९

ऐन पावसाळ्यात पाण्याची टंचाई भासाणे म्हणजे प्रत्येकाला आश्चर्यात टाकणारी गोष्टच. एकीकडे सतत येणाऱ्या पावसाच्या कहराने देशात विविध ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, दुसरीकडे मुंबईनगरीची लोकल जलमग्न रुळांवरून धावू लागली आहे, तर काही ठिकाणी धरण व ढगफुटीची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, या पावसाने पिण्याच्या व घरघुती वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज पूर्ण होईलच असे नाही. देशातील काही ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याची अजूनही टंचाई भासते आहे. त्यासाठी प्रशासनाला दुसऱ्या ठिकाणांहून पाणी वाहून आणण्याची कसरत करावी लागत आहे. आणि तेही कशाने? तर चक्क रेल्वेने!

हो! हे खरंय. ऐन पावसाळ्यात चेन्नईसारखे शहर पाणी टंचाईने ग्रासले आहे. त्यासाठी चक्क रेल्वेने वेल्लोरहून चेन्नईला पाणी आणण्याची कसरत सुरू आहे. वेल्लोरच्या जोलरपेट रेल्वेस्थानाकावरून चेन्नईला पाणी वाहून नेणाऱ्या पहिल्या मालगाडीचा आज सकाळी प्रवास सुरु झाला. चेन्नईत आलेल्या पाणीबाणीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने वेल्लोरहून मालगाडीने पाणी आणले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. वेल्लोरच्या जोलरपेट रेल्वे स्थानकावरून पाणी वाहून नेण्यास तयार असलेल्या या मालगाडीची सुरुवातीची छायाचित्रे एएनआय या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहेत.

पाणी टंचाईच्या या संकटात चेन्नईच्या जनतेला यामुळे तात्पुरते का होईना, मात्र पाणी उपलब्ध होणार आहे हे खरे. ही चांगलीच बाब आहे. पण ही तात्पुरती सोय कधीपर्यत चालणार? हा मोठा प्रश्न आहे. चेन्नईत हळूहळू भूजलाची पातळी कमी होत चालली आहे व सोबतच जलाशये कोरडी पडू लागल्याने पाणी टंचाई ओढवली आहे.

पाणी टंचाईवर तामिळनाडूच्या जनतेकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवरून असे कळते की, पाणी टंचाईचे ओढवलेले हे संकट राज्य शासनाच्या निष्काळजीपणाचे एक लक्षण आहेत. पाणीसाठा वाढवण्यासाठी व पाण्याचे योग्यरीत्या संवर्धन न केल्याने आज राज्यात ही परिस्थिती ओढावली आहे, हे मात्र खरे. दुसरीकडे, आता पाणी वाहून आणण्याशिवाय दुसरा पर्याय शासनाकडे नाही. मान्सून सुरू होईपर्यंत दरदिवशी ६५ कोटी रुपयांचे पाणी वेल्लोरहून चेन्नईला आणले जाईल, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणाले होते.

जोलरपेट स्थानकावरून निघालेली ही ट्रेन १० एमएलडी पाणी घेऊन चेन्नईला पोहचेल. याआधी गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, या टँकरवाल्यांना खूप दुरून पाणी वाहून आणावे लागत असल्याने त्यांनीही भाड्यामध्ये दुप्पट वाढ केली आहे.

विशेष म्हणजे, चेन्नईचे पाणी संकट बघून जागतिक स्तरावरूनही प्रतिक्रिया यायला वेळ लागला नाही. हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता व पर्यावरण अभ्यासक लियानार्दो डिकॅपरिओ याने समाजमाध्यमांवर पोस्ट करत चेन्नईच्या जलसंकटाविषयी चिंता व्यक्त केली होती. आता पाणी टंचाईतून चेन्नईला फक्त पाऊसच बाहेर काढू शकतो, असे तो म्हणतो.

View this post on Instagram

 

A post shared by Leonardo DiCaprio (@leonardodicaprio) on

चेन्नईत ओढवलेल्या या पाणी टंचाईच्या मागे चेन्नईच्या शासनाचा निष्काळजीपणा असल्याचे म्हणत विविध राजकीय पक्षांनी रस्त्यांवर येऊन आंदोलन केले होते. दुसरीकडे, ‘रेेन मॅन’ म्हणून ओळखले जाणारेे डॉ. राघवन पाऊस पाणी संंग्रहण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) विषयी जागृती निर्माण करण्याचे काम करत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सामूहिकरीत्या पाणी संग्रहणविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.

शेवटी, ऐन पावसाळ्यात चेन्नईसारख्या शहरात ओढावलेल्या या पाणीबाणीवर प्रशासन कसं मात करेल, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोबतच स्थानिक लोकांचा या टंचाईच्या व टंचाईनंतर ‘पाणी’विषयी संवर्धनात्मक दृष्टिकोन अतिशय उपयोगाचा ठरेल.

 

◆◆◆

 

जगभरातील विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: