जगभरातील ९००हून अधिक प्रजाती नामशेष : आययूसीएनची सुधारित लाल यादी

ब्रेनवृत्त । नागपूर


आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने (आययूसीएन) नुकत्याच जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जगभरातील ९०० हुन अधिक प्रजाती नामशेष झाल्या आहेत. फ्रान्समधील मार्सेलीमध्ये आयोजित जागितक संवर्धन अधिवेशनात ४ सप्टेंबर रोजी आययूसीएनची (IUCN : International Union for Conservation of Nature) जगभरातील प्रजातींशी संबंधित अद्ययावत लाल यादी (रेड लिस्ट) जाहीर करण्यात आली आहे.  

आययूसीएनद्वारे नुकत्याच जाहीर झालेल्या लाल यादीनुसार जगभरातील ९०२ प्रजाती नामशेष झाल्या आहेत. सोबतच, मूल्यमापन करण्यात आलेल्या एकूण प्रजातींपैकी ३०% प्रजातींना नामशेष होण्याचा धोका आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने अलीकडे एकूण १,३८,३७४ प्रजातींचे मूल्यमापन केले आहे, त्यांपैकी ३८,५४३ प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

फक्त २५ शहरे उत्सर्जित करतात ५०% पेक्षा जास्त हरितगृह वायू!

> अशी आहे आययूसीएनची अद्यायावत आकडेवारी

जवळपास ८० प्रजाती ह्या जंगली अधिवास क्षेत्रातून नामशेष झाल्या आहेत. ८,४०४ प्रजाती गंभीरपणे संकटग्रस्त (Critically Endangered) आहेत, तर १४,६४७ प्रजाती संकटग्रस्त (Endangered) गटात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. १५,४९२ प्रजाती असुरक्षित (Vulnerable) आहेत आणि ८,१२७ संकटाच्या जवळ (Near Threatened) आहेत. जवळपास ७१,१४८ प्रजातींविषयी सद्या चिंतेची बाब नाही (Least Concern), तर १९,४०४ प्रजातींविषयी हवी तेवढी माहिती उपलब्ध (Data Deficient) नाही.

दुसरीकडे, व्यावसायिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या टुना जातीच्या माशांच्या सातपैकी चार प्रजातीची परिस्थिती सुधारत असल्याचे आययूसीएनने प्रसिद्धीपत्रकात हटले आहे. अवैध मासेमारीवर आळा घालणाऱ्या तसेच शाश्वत पद्धतीने मासेमारी कोटा वितरित करणाऱ्या देशांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे, असेही संघाने म्हटले.

अद्ययावत लाल यादीनुसार जगभरातील शार्क तसेच रे प्रजातींपैकी ३७% प्रजातींना नामशेष होण्याचा धोका आहे. शार्क आणि रे प्रजाती संकटग्रस्त होण्यामध्ये सर्वाधिक वाटा अतिमासेमारीचा आहे. त्यानंतर ३१% वाटा अधिवास नष्ट होण्यामुळे तर १०% वाटा हवामान बदलाचा आहे.

पाल प्रजातीतील जगातील सर्वांत मोठी कोमोडो ड्रॅगन पाल (Varanus komodoensis) या सरपटणाऱ्या प्राण्याला असुरक्षित गटातून आता संकटग्रस्त गटात वर्गीकृत करण्यात आले आहे. वाढते वैश्विक तापमान आणि परिणामी सागर जलाची वाढणारी पातळी यांमुळे पुढील ४५ वर्षांत जगभरातील कोमोडो ड्रॅगन्सचे अधिवास किमान ३० टक्क्यांनी कमी होणार आहेत. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा  www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: