कोव्हिड-१९ मुळे देशभरातील अंगणवाडी सेवा व मुलांमधील कुपोषण पातळीवर व्यापक परिणाम झाले आहेत. या परिणामांचे केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयालाने सर्वेक्षण करावे, अशा सूचना संसदीय समितीने मंत्रालयाला काल दिल्या आहेत.
राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षेतेखालील शिक्षण, महिला, बालके, तरुण व क्रीडा यांसंबंधीच्या स्थायी संसदीय समितीने मंत्रालयाला कोव्हिड महासाथरोग (पँडेमिक) आणि त्याचे बहुआयामी परिणाम लक्षात घेण्यास सुचवले आहे. समितीच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, “महासाथरोग काळात अंगणवाड्यांनी कशाप्रकारे सेवा पुरवल्या आणि मुलांमधील खुरटी वाढ व कमी वजन आदींवर कोरोनाचे काय परिणाम झाले, याचे परीक्षण करण्याचे मंत्रालयाला सुचवण्यात आले आहे.”
दुसरीकडे, शासनाने देशभरातील जवळपास १४ लाख अंगणवाडी सेवांचा मागोवा घेण्यासाठी ‘पोषण ट्रॅकर’ (Poshan Tracker) हे अनुप्रयोग सुरु केले आहे. परंतु, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी समितीला दिलेल्या माहितीनुसार, या अनुप्रयोगात (अप्लिकेशन) माहिती भरण्याची सुरुवात फक्त १ जूनपासूनच झाली आहे.
वाचा । ब्रेनविश्लेषण : भारत क्षयरोग अहवाल २०२०
संसदीय समितिच्या दुसऱ्या एका सदस्याने सांगितले, की संबंधित मुद्यावर मंत्रालय समितीचे समाधान करू शकले नाही. मंत्रालयाने राज्यांकडून अभिप्राय नमुने (फिडबॅक फॉर्म) जमा करवून घेतले आहेत असे सांगितले, पण यामध्ये सर्वेक्षणाचा काहीही उल्लेख नाही. त्यामुळे, मंत्रालयाने योग्य सर्वेक्षण करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्यावा असे समितीने सुचवले आहे.
दुसरीकडे, कोरोना काळात पालकांना गमावलेल्या मुलामुलींना आधार देण्यासाठी शासनाने १० लाख रुपये पीएम केयर्स (PM CARES) निधीतून वितरित करण्याचे जाहीर केले आहे. मात्र आतापर्यंत पीएम केयर्समधून याबाबतीत कोणताही निधी खर्च झालेला नाही आणि याबाबतीत मंत्रालयाचे प्रतिसाद संदिग्ध आहेत, असेही एका सदस्याने सांगितले आहे.
Subscribe on Telegram @marathibrainin
अशीच विविधांगी माहिती, विश्लेषण, बातम्या, साहित्य आपल्या मायबोली मराठीतून थेट जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.