ब्रेनवृत्त | यवतमाळ
३० जुलै २०१९
सध्या जिकडेतिकडे विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या राजकीय घडामोडींवर भाजपवर राज्यातून उपरोधिक टीकांना सुरुवात झाली आहे. नागपूर, यवतमाळ व पुणे शहरांत काहींनी तर चक्क फलकांच्या माध्यमांतून भाजपवर जाहीर टीका करण्याचे धाडस केले आहे.
यवतमाळ बसस्थानकाच्या चौकात भाजपवर उपरोधिक टीका करणारे मोठे फलक लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या फलकाचा मथळाच सर्वांचे लक्ष वेधून घेणारा आहे. ‘भाजपा, प्रवेश देणे सुरू आहे’ असा मथळा या फलकाचा आहे. यासंबंधीचे फोटोसह एक वृत्त लोकमत ऑनलाइनने प्रकाशित केले आहे. या फलकावर ‘भाजपा, प्रवेश देणे सुरू आहे’ असे लिहिले असून, नियम व अटींचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती व सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव अशा तीन प्रमुख अटी फलकावर लिहिलेल्या आहेत. सोबतच, ‘विचारधारेची कुठलीही अट नाही’ अशी तळटीपही देण्यात आली आहे. आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्र शाखेत अॅडजेस्ट करता येईल,’ असा उल्लेखही या बॅनरवर आहे.
त्या फुटलेल्या आमदारांना भाजपचे मंत्रीपदही ?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी सुशिक्षित बेरोजगारांसाठी लवकरच मेगा भरती घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. उलट भाजपामध्ये इतर पक्षांच्या नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सुशिक्षित बेरोगरांकडून राज्य शासनाला कंटाळून हे फलक लावण्यात आले असावे. बसस्थानक सारख्या सार्वजनिक ठिकाणी लावलेले हे बॅनर सर्वांचा लक्ष वेधणारे आहेत. हे बॅनर नेमके कुणी लावले, याची चर्चा आता सगळीकडेच सुरू आहे.
दुसरीकडे, फलक लावून भाजपवर टीका करण्याचे हे धाडस यवतमाळमध्येच नाही, तर आता राज्यभर अशा प्रकारचे फलक लावण्याचे प्रकरण दिसू लागले आहे. पुणे आणि नागपुरातही जागोजागी ‘भाजपा, प्रवेश देणे सुरू आहे’ असे फलक लावून भाजपवर उपरोधिक टीकासत्र सुरू झाले आहे.
◆◆◆