Site icon MarathiBrain.in

‘केबीसी’मध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख ; ‘बिग बी’ व सोनी टीव्हीवर टीकांचा वर्षाव!

सोनी टीव्हीवर काल प्रसारित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रम विचारण्यात आलेल्या एका प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन व सोनी टीव्हीवर समाजमाध्यमांतून टीकांचा वर्षाव होत आहे. अमिताभ बच्चन व सोनी टीव्हीने माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

ब्रेनवृत्त, ०७ नोव्हेंबर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करीत असलेल्या व सोनी टीव्हीवर प्रदर्शित होत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ या रिऍलिटी शोचे यंदाचे सत्र फारच गाजत आहे. मात्र, हा कार्यक्रम आणि बिग बी अमिताभ बच्चन आता एका नव्या वादात सापडले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण महाराष्ट्रातील मराठी जनतेला व सोबतच देशातील अनेक दर्शकांना नाराज करणारे आहे. काल प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. एका प्रश्नाच्या पर्यायांत ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने समाजमाध्यमांवरून सोनी टीव्ही व अमिताभ बच्चन यांच्यावर टीकेचे झोळ उठले आहेत.

नुकत्याच प्रसारित झालेल्या केबीसीच्या एपिसोडमध्ये गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर बसल्या होत्या. या दरम्यान त्यांना प्रश्न विचारताना अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला.  या प्रश्नासाठी १. महाराणा प्रताप, २. राणा सांगा, ३. महाराजा रणजीत सिंह व ४. शिवाजी असे चार पर्याय देण्यात आले होते.

मात्र, वरील पर्यायांमध्ये छत्रपती शिवरायांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रम प्रदर्शित होताक्षणी महाराष्ट्रातील जनतेने, छत्रपती शिवरायांना आदर्श मानणाऱ्या लोकांनी समाजमाध्यमांवरून आयोजकांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी लोकांनी सोनी टीव्ही व अमिताभ बच्चन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटर आणि फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवरून छत्रपती शिवरायांचा अपमान व अनादर केल्याप्रकरणी बिग बी व सोनी टीव्हीने माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. #BycottKBC #BycottSoniTV अशा विविध हॅशटॅगसह समाजमाध्यमांवर सोनी टीव्ही व केबीसीवर निषेध नोंदवला जातो आहे आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, केबीसीच्या विचारल्या गेलेल्या संबंधित प्रश्नात मुघल औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ अशी उपाधी लावण्यात आली आहे, मात्र शिवरायांना एकेरी संबोधन दिलेल्या वाद अजून जास्तच पेटला आहे. याप्रसंगी तुम्ही औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता, तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का? असा प्रश्न लोकांकडून विचारला जात आहे.

दुसरीकडे, केबीसीमध्ये याआधीही चुकीच्या पद्धतीने माहिती दर्शकांना पोहचवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे व हे कार्यक्रम वेळोवेळी ट्रोलिंगचा विषय बनले आहे.

 

◆◆◆

Exit mobile version