Site icon MarathiBrain.in

सानिया ठरली ‘फेड कप हार्ट’ची मानकरी ; पुरस्काराची रक्कम तेलंगणा निधीला दान

ब्रेनवृत्त, १२ मे

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ‘फेड कप हार्ट (Fed Cup Heart)’ या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. हा पुरस्कार जिंकणाऱ्या विजेत्या खेळाडूंना २ हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळते. मात्र, देश कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकला असताना सानियाने या पुरस्कारातून मिळालेली सर्व रक्कम तेलंगणाच्या ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला दान केली आहे.

भारतीय टेनिसच्या इतिहासात हा पुरस्कार जिंकणारी सानिया ‘पहिली भारतीय महिला खेळाडू’ ठरली आहे. सानियाला फेड कप ‘एशिया/ओशिनिया  (Asia/Oceania) गट १ हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते आणि या पुरस्कारासाठी नामांकन मिळणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. एशिया/ ओशेनिया  गटात सानिया मिर्झाने १० हजारापेक्षा जास्त मते घेत हा पुरस्कार आपल्या नावावर केला. इंडोनेशियातील 16 वर्षाची प्रिस्का मॅडलिन नुग्रोहो सानियाची प्रतिस्पर्धी होती.  चाहत्यांनी केलेल्या ऑनलाईन व्होटिंगद्वारे सानिया मिर्झाला हा पुरस्कार मिळाला आहे. एकूण मतांपैकी ६० टक्के मत सानिया मिर्झाला पडली आहेत.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. ”२००३ साली प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझा सर्वात मोठा सन्मान होता. माझी १८ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आहे आणि भारतीय टेनिस संघाला ‘Fed Cup Heart पुरस्कार’ मिळवणारी पहिली भारतीय ठरल्याचा मला अभिमान आहे.  मी हा पुरस्कार माझ्या देशवासियांना समर्पित करते, आणि माझ्या चाहत्यांचीही मी आभारी आहे.” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच ”भविष्यातही देशासाठी अशीच चांगली कामगिरी करत राहील,’ असा मानस असल्याचेही सानिया मिर्झाने म्हटलंय.

 

● फेड चषकमधील सानियाची कारकीर्द

सहा वेळा ग्रँड स्लॅम विजेती सानियाने २०१६  नंतर प्रथमच फेड कप संघात प्रवेश केला. फेड चषक प्लेऑफमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी तिने अंकिता रैनाबरोबर काम केले. यावर्षी फेड चषक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी पाहता, फेड कप हार्ट पुरस्कार गट १ साठी  सहा खेळाडूंचे  नामांकन करण्यात आले. ऑनलाईन मतदानाच्या आधारे हार्ट पुरस्कार विजेत्याची घोषणा करण्यात आली. १  ते ८  मे दरम्यान ऑनलाइन मत देऊन चाहत्यांनी सानिया मिर्झाला मते देत विजेता घोषित केला.

दरम्यान, गेल्या काही वर्षात सानिया बाळंतपणामुळे मैदानापासून दुरावली होती. त्यानंतर मात्र, सानिया मिर्झाने गेल्या वर्षी दमदार पुनरागमन केलं होतं. होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘महिला दुहेरी स्पर्धेचं विजेतेपद’ मिळवत सानियाने आपल्यातला खेळ अजून शिल्लक असल्याचं स्पष्ट केलं होतं.

 

◆◆◆

Exit mobile version