महाराष्ट्राची कांचनमाला ठरली देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यावर्षीसाठीच्या राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला ९ पुरस्कार जाहीर झाले आहेत. नागपूरची कांचनमाला पांडे ठरली आहे ‘देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू’. 

 

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर

केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘राष्‍ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०१८’ ची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू’ ठरली आहे. महाराष्ट्राला एकूण नऊ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारांमध्ये नाशिकचा स्वयं पाटील यास देशातील ‘सर्वोत्कृष्ट सृजनशील बालका’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यातील एकूण ६ खेळाडू आणि ३ संस्थांना हा पुरस्कार जाहीर झाला असून, राष्ट्रपतींच्या हस्ते ३ डिसेंबर ला ‘जागतिक अपंगदिनी’ हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

 

● देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू : कांचनमाला पांडे

क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कामगिरी आणि योगदानाची दखल घेऊन नागपूरच्या कांचनमाला पांडे हिला ‘सर्वोत्कृष्ट महिला दिव्यांग क्रीडापटू’चा ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कंचनमाला पांडे

नागपूरच्या कांचनमाला पांडे ही मेक्सिको येथे पार पडलेल्या ‘पॅरा वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप-२०१७‘ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळवून देणारी देशातील पहिली जलतरणपटू ठरली होती. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात कांचनमालाचा सत्कार केला होता व १५ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने कांचनमाला हिला जलतरण प्रशिक्षक म्हणून नोकरीही देऊ केली आहे.

जन्मांध असणाऱ्या कांचनमालाने हे जग बघितले नाही, मात्र जगाला तिच्या कार्याचा हेवा वाटावा अशी तिची कामगिरी आहे. कांचनमाला ही मूळची अमरावतीची. कांचनमालाने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरण तलावात जलतरणाचे धडे गिरविले. सध्या ती नागपूर येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयात सहायक पदावर कार्यरत आहे.

 

● नाशिकचा स्वयं पाटील : सर्वोत्कृष्ट सृजनशील बालक

नाशिकच्या स्वयं पाटीलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सृजनशील बालकाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार जाहीर झाला आहे.

सृजनशील बालक पुरस्काराचा मानकरी स्वयं पाटील

जन्मत: ‘डाऊन सिंड्रोम’ने ग्रस्त स्वयंच्या हृदयाला छिद्र आहे. यातून तो बरा होत नाही, तर त्याच्यावर कानाशी संबंधित तीन शस्त्रक्रियाही झाल्यात. यातही तरीही त्याच्या आई-वडिलांनी खचून न जाता त्याला धीर देत सांभाळ केला. नाशिकच्या ‘जाजू माध्यमिक विद्या मंदिर’ येथे आता स्वयं सामान्य मुलांच्या शाळेत पाचव्या वर्गात शिकतो. त्याने गेटवे ऑफ इंडिया ते सॅनक्रॉक हे ५ कि.मी.चे समुद्रातील अंतर अवघ्या एक तासात पूर्ण करून जलतरणात ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद केली. अपंगत्वावर मात करून स्वयं सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण घेत आहे, तो उत्तम डांस करतो व विविध डांस स्पर्धांमध्ये त्याला पुरस्कार मिळाले आहेत. स्वयंने मॉडेलिंगही केली आहे व ‘डी कॅटलॉन’ या नामांकित कंपनीसह नाशिकच्या ‘अशोका रिसॉर्ट’साठी जाहीरातही केली आहे.

 

● पुण्याचे भूषण तोष्णीवाल ठरले रोल मॉडेल

पुणे येथील दृष्टिबाधित भूषण तोष्णीवाल यांना ‘रोल मॉडेल पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तर आशिष पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग कर्मचाऱ्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सोबतच, आयआयटी मुंबईचे प्राध्यापक रवी पुवैय्या यांना दिव्यांगांसाठी केलेल्या संशोधनासाठी तर दिव्यांगांच्या उत्थानासाठी  कार्य करणारे मुंबईतील बोरीवली पूर्व चे योगेश दुबे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

● पिंपरी चिंचवड मनपा व मॉडर्न कॉलेजला पुरस्कार जाहीर

दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून दोन संस्थाची  निवड झाली असून या दोन्ही संस्था महाराष्ट्रातील आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत देशात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे संकेतस्थळ, तर खाजगी क्षेत्रात पुणे येथील ‘मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय‘ देशात सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. महाराष्ट्राच्या पुरस्करांत भर घालत मुंबई येथील वरळी सी-फेस भागातील ‘नॅब एम्प्लॉयमेंट’ या संस्थेला दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेलाही पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

● राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार:

१. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने जागतिक अपंग दिनानिमित्त देशातील दिव्यांगजन व्यक्तींसह दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

२. ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार-२०१८’साठी विविध १४ श्रेणींमध्ये देशातील एकूण ७९ व्यक्ती व संस्थांना यावर्षी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील ६ व्यक्ती आणि ३ संस्थांचा यात समावेश आहे. येत्या ३ डिसेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारितामंत्री थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

 

(संदर्भ: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय)

◆◆◆

 

तुमचे लिखाण व अभिप्राय आम्हाला पाठवा writeto@marathibrain.com वर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: