Site icon MarathiBrain.in

यंदाची ‘शिक्षण वारी’, मुंबईच्या दारी !

महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जाणारी ‘शिक्षणाची वारी’ यंदा २८ नोव्हेंबर पासून मुंबईत सुरू होत आहे. या वारीचे नंतरचे टप्पे कोल्हापूर, जळगाव, वर्धा आणि नांदेड येथे आयोजित केले जाणार आहेत.

 

मराठीब्रेन वृत्त

मुंबई, २६ नोव्हेंबर

शालेय गुणवत्ता वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या विकासात लोकसहभाग वाढवण्याच्या संकल्पनेतून राबवल्या जाणारी ‘शिक्षणाची वारी’ यावर्षी मुंबईतून सुरू होणार आहे. या वारीचे यंदाचे चौथे वर्ष असून, ही वारी २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे.

चौथ्या शिक्षणाच्या वारीच्या पहिल्या टप्प्याला २८ नोव्हेंबर पासून मुंबईत सुरुवात होणार.

विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षक-पालक दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते. ‘शाळा व्यवस्थापन समिती’ ही मुख्यत्वेकरून पालकांचे प्रतिनिधित्व करते. शाळा व्यवस्थापन समिती हा घटक सक्षम झाल्यास शाळा विकासात लोकसमुदायाचा सहभाग अधिक वाढेल, त्यातून शिक्षक-पालक सुसंवाद निर्माण होईल आणि  १०० % विद्यार्थी प्रगत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, या उद्देशाने शासनातर्फे ‘शिक्षणाची वारी’ आयोजित केली जाते. शालेय गुणवत्ता विकासासाठी व शालेय व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी यंदा ही वारी मुंबईत आयोजित होणार आहे. मुंबईतील एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वान्द्रे पूर्व येथे २८ ते ३० नोव्हेंबर, २०१८ या कालावधीत या वारीचे आयोजन होईल.

हेही वाचा : समाजमाध्यमांतून शिक्षकांची ‘तंत्रस्नेही’ वाटचाल

● ‘शिक्षणाची वारी’ चे स्वरूप:

मुंबईच्या वारीत रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक भेट देणार आहेत. दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व शिक्षणप्रेमींसाठी वारी खुली असणार आहे.

शाळा विकास आराखडा व शाळा व्यवस्थापन समिती संरचना, पालकांची शाळांना अध्यापन व कौशल्य विकासात मदत, किशोरवयीन आरोग्य शिक्षण,  शालेय पटसंख्येत भरीव वाढ होण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम, लोकसहभाग, शालेय पोषण आहार, स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभाग, स्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालय, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, गणित व भाषा वाचन विकास, कृतियुक्त विज्ञान,  तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, कला, कार्यानुभव व क्रीडा विषयक उपक्रमांचे प्रयोग येथे मांडण्यात आले आहेत.

● आजपर्यंतच्या  शिक्षणाची वाऱ्या

१) शालेय गुणवत्ता विकास  व शालेय व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ‘शिक्षणाची वारी’ आयोजित केली जाते. यंदा वारीचे  चौथे वर्ष असेल.

२) आतापर्यंत आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये सुमारे लाखभर शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांचा लाभ घेतला आहे. यापूर्वी पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक आणि  रत्नागिरी येथे शिक्षण-वारीचे आयोजन झाले होते.

३) यावर्षी वारीचे आयोजन मुंबई, कोल्हापूर, वर्धा, नांदेड आणि जळगाव येथे करण्यात आले आहे. या टप्प्यातील पहिली वारी मुंबईत एमएमआरडीए मैदान, बीकेसी, वान्द्रे पूर्व येथे दि. २८ ते ३० नोव्हेंबर, २०१८ या कालावधीत होत आहे.

हे वाचलंत का? ‘शिक्षणाची दैनावस्था – भाग २’

 

● शिक्षण वारीचे इतर टप्पे:

‘शिक्षणाची वारी’ च्या चौथ्या वर्षातील पहिला टप्पा मुंबईत पार पडेल. त्यांनतर कोल्हापूर येथे वारीचा दुसरा टप्पा १० ते १२ डिसेंबर २०१८दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.  तिसरी वारी वर्धा ३ ते ६ जानेवारी, २०१९ व चौथी वारी नांदेड येथे २९ ते ३१ जानेवारी, २०१९ या कालावधीत आयोजित केली जाईल. यावर्षीच्या वारीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा जळगाव येथे १५ ते १७ फेब्रुवारी, २०१९ दरम्यान पार पडेल.

विविध शैक्षणिक प्रयोगांची सर्वांना माहिती व्हावी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना या प्रयोगांचा अंगिकार करता यावा. अनुभव घेता यावा हा या वारीच्या आयोजनामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

 

◆◆◆

Exit mobile version