‘कोव्हिड-१९’च्या संपर्कात आलेल्या सुमारे ८०० लोकांवर ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ (Hydroxychloroquine)आणि ‘कृतक गुटी’ (Placebo) यांचा वाशिंग्टन येथील संशोधकांनी यादृच्छीकपणे वापर केला. अभ्यासाअंती असा निष्कर्ष निघाला की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रतिबंधात्मक औषध म्हणून प्रभावी नाही. वाचा सविस्तर या संशोधनाविषयी.
ब्रेनविश्लेषण | सागर बिसेन
‘कोव्हिड-१९‘ अथवा कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आलेल्यांनी लगेच ‘हायड्रॉसीक्लोरोक्वीन’ हे औषध घेतल्याने या आजाराच्या संसर्गावर प्रतिबंध आणण्यास संख्यात्मकरित्या प्रभावीपणे मदत होत नसल्याचे वॉशिंग्टन येथील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. तब्बल ८०० हून अधिक लोकांवर वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर शास्त्रज्ञ या निष्कर्षावर पोहचले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हायड्रॉसीक्लोरोक्वीन‘ औषधीचा पुरजोर पुरस्कार करत नव्या कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपचार (Prophylaxis) म्हणून वापरत असल्याचे घोषित केले होते. मात्र, शास्त्रज्ञांनी एका अभ्यासातून या औषधीबद्दल नवे निष्कर्ष काढले आहेत. संयुक्त राज्ये (US) आणि कॅनडामधील सुमारे ८२१ लोकांचा सहभाग असलेल्या एका प्रयोगातून दिसून आले आहे की, हे औषध एखाद्या रुग्णांची चिंता शमवण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘कृतक गुटी’पेक्षा (Placebo) जास्त अजून काही नाही.
‘मिंनेसोटा विद्यापीठा’तील (University of Minnesota) संशोधकांच्या समूहाने हा अभ्यास केला असून, याविषयी शोधनिबंध ‘न्यू इंग्लंड वैद्यकीय नियतकालिके’त (New England Journal of Medicine) प्रकाशित झाला आहे. या प्रयोगासाठी संशोधकांनी जे प्रौढ व्यक्ती १० मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त काळ व सहा फूट किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरून ‘कोव्हिड-१९’ रुग्णांच्या संपर्कात आले असतील, अशांची नोंदणी करून घेतली.
● कसा झाला अभ्यास ?
या लोकांपैकी बहुतांश, ज्यांनी मुखपट्टी (Face Mask) व संरक्षणात्मक चष्म्याचा (Eye Shield) वापर केला नव्हता, अशा ७१९ जणांना कोरोना विषाणूूच्या संसर्गाचा ‘सर्वाधिक धोका’ असल्याचे दिसून आले. तर, ज्यांनी फक्त मुखपट्टीचा वापर केला होता अशा उर्वरितांना ‘मध्यम धोका’ असल्याचे जाणवले. या सर्वांना चार दिवसांच्या आत यादृच्छीकरित्या हायड्रॉसीक्लोरोक्वीन हे औषध अथवा प्लेसबो (Placebo) देण्यात आले. त्यानंतर, दोन आठवड्यांनी या सर्वांची चाचणी करण्यात आली.
ब्रेनविश्लेषण : येत्या सहा महिन्यांत भारतात लाखों बालमृत्यूंची शक्यता !
● दोन्ही उपचारांनंतर बाधितांतील अंतर फारच कमी
प्रयोगशाळा चाचणी अथवा वैद्यकीय लक्षणे तपासणीनंतर दिसून आले की, हायड्रॉसीक्लोरोक्वीन देण्यात आलेल्या ४१४ पैकी ४९ लोकांना व कृतक गुटी दिलेल्या ४०७ पैकी ५८ लोकांना ‘कोव्हिड-१९’ची लागण झाली आहे. अर्थात, औषध घेतलेल्यांपैकी ११.८३% प्रौढांना व गुटी घेतलेल्या १४.२५% प्रौढांना आजाराची बाधा झाली आहे. हे फरक फक्त २.४% इतके आहे.
प्रयोगाअंती मिळालेल्या या आकडेवारीतून दोन्ही उपचारांनंतरही बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतील फरक खूप कमी असल्याचे आढळले. त्यामुळे, विविध वेदनाशामक उपाय व गुटींच्या तुलनेत हायड्रॉसीक्लोरोक्वीन हे औषधसंख्यात्मकरित्या विशेष परिणामी नसल्याचे निष्कर्ष संशोधकांनी काढले आहे. तसेच, औषधाचे दुष्परिणाम (Side Effects) कृतक गुटीपेक्षा जास्त संभाव्य असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे.
या प्रयोगविषयीच्या शोधनिबंधाचे लेखक लिहितात, “ही यादृच्छीक चाचणी ‘कोव्हिड-१९’च्या संपर्कात आलेल्यांवर ‘ प्रतिबंधात्मक उपचार म्हणून ‘हायड्रॉसीक्लोरोक्वीन’चे लक्षणीय फायदे असल्याचे दर्शवत नाही.”
हा अभ्यास एक ‘यादृच्छीक नियंत्रित चाचणी’ (RCT : Randomized Controlled Trial) असल्याने याच्या अंतिम परिणामांकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आरसीटी म्हणजे एक अतिशय दक्षतेने करण्यात आलेले प्रयोग असते, जे वैद्यकीय परिणामांच्या चौकशीसाठी ‘सुवर्ण मानक’ (Gold Standard) समजले जाते.
हेही वाचा : भारतात ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’चा वापर सुरूच राहणार : आयसीएमआर
दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठातील औषध आणि रोगपरिस्थितीविज्ञान (Epidemiology) विषयाचे प्राध्यापक मार्टिन लँडरे यांच्या मते हायड्रॉसीक्लोरोक्वीनचे काही सकारात्मक परिणाम तपासण्यासाठी अजून चाचण्यांची गरज आहे. प्रा. मार्टिन लँडरे वरील अभ्यासात सहभागी नव्हते. मार्टिन म्हणतात, “हायड्रॉसीक्लोरोक्वीनचे मध्यम सकारात्मक परिणाम आहेत की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी अजून संशोधनांची गरज आहे. हा अभ्यास अंतिम अभ्यास ठरण्यासाठी फरक छोटा आहे.”
दोन आठवड्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’च्या वापरावर तात्पुरती बंदी आणली आहे. मात्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या औषधीचे भारतात वापर सुरूच असेल, असे सांगितले आहे.