ब्रेनवृत्त । पुणे
जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका, कवयित्री तसेच स्त्री हक्क चळवळीतील प्रमुख चेहरा असलेल्या कमला भसीन यांचे आज (शनिवारी) पहाटे निधन झाले. त्यांना कर्करोग झाल्याचे काही दिवसांपूर्वी निदानातून कळले होते व त्यावर उपचार सुरु होते. भारत आणि दक्षिण आशियाई क्षेत्रातील स्त्रीवादी चळवळीचा प्रमुख आवाज म्हणून कमला भसीन प्रख्यात आहेत. त्या ७५ वर्षांच्या होत्या.
सन १९७०च्या दशकापासून जेष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या कमला भसीन स्त्री-पुरुष समानता, शिक्षण, दारिद्र्य-निर्मूलन, मानवाधिकार आणि दक्षिण आशियातील शांतता यांसारख्या मुद्यांवर कार्य करण्यात सक्रिय होत्या. मानवाधिकार कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले, की कमला भसीन यांनी आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने स्त्रीवादी चळवळीच एक कणखर आवाज हरपल्याची भावना सगळीकडे व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा । ‘मासिकपाळी : स्त्रीसाठी सर्वांत पवित्र गोष्ट’ : भाग १
कविता श्रीवास्तव यांनी ट्विटले आहे, “आमची प्रिय मैत्रीण कमला भसीन यांचे २५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास निधन झाले. भारत आणि दक्षिण आशिया क्षेत्रातील महिलांच्या चळवळीला हा मोठा धक्का आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जगण्याचा आनंद घेतला. कमला तुम्ही आमच्या हृदयात सदैव जिवंत असाल.”
Kamla Bhasin, our dear friend, passed away around 3am today 25th Sept. This is a big setback for the women's movement in India and the South Asian region. She celebrated life whatever the adversity. Kamla you will always live in our hearts. In Sisterhood, which is in deep grief pic.twitter.com/aQA6QidVEl
— Kavita Srivastava (@kavisriv) September 25, 2021
दक्षिण आशियातील व प्रामुख्याने भारतातील स्त्रीवादी चळवळीला दशा आणि दिशा देण्याचे काम कमाल भसीन यांनी केले आहे. तळागाळातील क्षेत्रांत काम करणाऱ्या भसीन स्त्रीवादी तत्त्वांना जोडणाऱ्या ‘संगत’ दक्षिण आशियाई नेटवर्कच्या संस्थापिका म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ग्रामीण आणि आदिवासी समाजातील वंचित महिलांसाठी काम करण्याच्या उद्देशाने त्यांनी २००२ मध्ये ‘संगत’ची स्थापना केली होती.
ब्रेनसाहित्य । गरज ‘सवाष्ण-असवाष्ण भेदाभेद’ ओलांडण्याची
भसीन यांचा जन्म २४ एप्रिल १९४६ रोजी मंडी बहाउद्दीन या सध्या पाकिस्तानात असलेल्या जिल्ह्यात झाला. त्या स्वतःला ‘मध्यरात्रीची मुलगी’ म्हणवून घेत, ज्याचा संदर्भ फाळणीच्या आसपास जन्मलेल्या उपखंडातील पिढीशी आहे. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली आणि पश्चिम जर्मनीतील मन्स्टर विद्यापीठातून समाजशास्त्राचा अभ्यास केला आहे.
१९७६ ते २००१ पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतही (FAO) काम केले. त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे ‘संगत’ च्या कामांसाठी आणि तळागाळातील महिलांच्या प्रश्नांवर कार्य करण्यासाठी झोकून दिले. सामाजिक कार्यासोबतच त्यांनी स्त्री हक्क व स्त्रीवाद यांवर आधारित सखोल लिखाण केले आहे, तसेच त्यांच्या कविताही प्रसिद्ध आहेत.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.in