जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

ब्रेनवृत्त, पुणे

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व स्त्री हक्क चळवळीतील लेखिका, महिलांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या विद्या बाळ यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८४ वर्षांच्या होत्या. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

स्त्री हक्कांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या जेष्ठ समाजसेविका आणि स्त्रीवादी लेखिका विद्या बाळ यांनी आज अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांचे आज निधन झाले. आज दुपारी 2 ते 5 या वेळेत त्यांचे पार्थिव नचिकेत, 33/ 25, प्रभात रोड, गल्ली क्र.४ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आजच संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. स्त्रीवादी चळवळीला विशेष योगदान देणाऱ्या विद्या बाळ या लेखिका आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होत्या. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले होते. तसेच रुढी, परंपरा यांच्यावर कडाडून प्रहार करत त्यांनी स्रियांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला.

● स्त्रीवादी कार्यकर्त्या विद्या बाळ

महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आयुष्यभर झटणाऱ्या विद्या बाळ यांनी ‘किर्लोस्कर’ मासिकातून लिखाणाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणूनही त्यांनी नोकरी केली. पुढे १९६४ ते १९८३ या दरम्यान त्यांनी ‘स्त्री’ या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर विद्या बाळ यांनी १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या त्या सुमारे 30 वर्ष संस्थापक संपादिका होत्या. या मासिकाद्वारे स्त्रियांचे विश्व उलगडत त्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यामुळे हे मासिक अल्पावधीत लोकप्रिय ठरले.

● स्त्रीवादी चळवळीत भरीव योगदान
स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्या बाळ यांनी ’नारी समता मंच’ स्थापन केले. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी जाऊन वाहत्या रस्त्यांवर ‘मी एक मंजुश्री’ नावाचं प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात स्रियांच्या समस्यांवर चर्चा झाली. त्यानंतर, स्त्रियांना बोलण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून विद्या बाळ यांनी ‘बोलते व्हा’ नावाचे केंद्र सुरू केले. सोबतच २००८ साली त्यांनी ‘पुरुष संवाद केंद्र’ही सुरू केले.

ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ’ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रूपांतरित कादंबरी लिहिली आहे. याशिवाय, ‘अक्षरस्पर्श ग्रंथालय’, ‘सखी साऱ्याजणी मंडळ’, ‘साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ’, ‘पुरुष उवाच अभ्यासवर्ग’ या व्यासपीठांच्या माध्यमातून विद्या बाळ यांनी त्यांच्या समाजकार्यात व्यापकता आणली.

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: