नागपूर आणि नाशिक, या दोन विभागांत ‘मौखिक आरोग्य सर्वेक्षण मोहीम’ पुन्हा एकदा २ ऑक्टोबर पासून सुरू होणार.
मुंबई, ३ सप्टेंबर
राज्यात २ ऑक्टोबरपासून नागपूर आणि नाशिक विभागात ‘मौखिक आरोग्य सर्वेक्षण मोहीम’ टाटा कर्करोग रुग्णालयाच्या सहकार्याने पुन्हा हाती घेतली जाणार आहे.
मंत्रालयात कर्करोग निदान व तपासणी मोहीमेसंदर्भात शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत ‘मौखिक आरोग्य सर्वेक्षण मोहीम’ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेत टाटा कर्करोग रुग्णालयाचे सहकार्य मिळणार असल्याचे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. या बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे उपस्थित होते.
● यापूर्वीची सर्वेक्षण मोहीम
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राज्यातील २३४ जिल्ह्यांमध्ये ‘मौखिक आरोग्य सर्वेक्षण मोहीम’ राबविण्यात आली होती. त्यामध्ये २ कोटी १५ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २ लाख ६२ हजार संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी सुमारे २०१३ रुग्ण बायोप्सीसाठी संदर्भित करण्यात आले. त्यापैकी १८०० रुग्णांची बायोप्सी झाली. त्यातील मौखिक कर्करोगाचे ५४० रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४९० रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले.
● नागपूर आणि नाशिक विभागाची स्थिती
या मोहिमेत नागपूर व नाशिक विभागांमध्ये अनुक्रमे ३३ लाख ६९ हजार ३८० व ५३ लाख ६४ हजार ३१० जणांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी नागपूर विभागात ३०७ जणांची बायोप्सी करण्यात आली असून १३१ जणांचे निदान झाले आहे व उर्वरीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्यातून (१६८) जणांची बायोप्सी करण्यात आली आहे
नाशिक विभागात ७४६ जणांची बायोप्सी करण्यात आली असून २०८ जणांचे निदान करण्यात आले, तर १८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यापाठोपाठ (४३४) तर अहमदनगर जिल्ह्यात (१४१) जणांची बायोप्सी करण्यात आली आहे. विभागात या दोन जिल्ह्यांमधून बायोप्सी झालेल्यांची संख्या मोठी आहे.
नागपूर व नाशिक, या दोन विभागांत संशयित रुग्णांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्याने, आरोग्यमंत्र्यांनी येत्या २ ऑक्टोबरपासून या दोन विभागांमध्ये पुन्हा मौखिक आरोग्य सर्वेक्षण राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
( सर्वेक्षण आकडेवारी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन )
◆◆◆