का होतेय दिल्लीतील सर्व जिल्ह्यांत ‘सिरो सर्वेक्षण’ ?

काही दिवसांपूर्वी ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ने (आयसीएमआर) देशातील विविध भागांत 24 हजार लोकांवरही हे सिरो सर्वेक्षण केले. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत वाढत्या संक्रमणादरम्यान सरकारने पुन्हा एकदा सिरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

ब्रेनविश्लेषण | अनुराधा धावडे

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणादरम्यान दिल्लीत सिरोलॉजिकल सर्वेक्षण सुरू होत असल्याची बातमी समोर आली आहे. या सर्वेक्षणाला ‘सिरो सर्व्हे’ (Sero Survey) म्हणून देखील संबोधले जाते. या सर्वेक्षणाच्या माध्यमांतून एखाद्या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग किती प्रमाणात पसरला आहे आणि त्या भागातील किती लोकांना कोरोनाविषाणूची लागण झाली आहे, हे तपासले जाते. सोबतच, त्यांच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती (Immunity Power) विकसित झाली आहे की नाही किंवा प्रतिपिंडे (Antibodies) तयार झाली आहेत की नाही, याचीही पाहणी या सर्वेक्षणातून केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) देशातील विविध भागांत 24 हजार लोकांवरही हे सिरो सर्वेक्षण केले. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत वाढत्या संक्रमणादरम्यान सरकारने पुन्हा एकदा सिरो सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे ‘सिरो सर्वेक्षण’ का आणि कसे केले जाईल?

प्रातिनिधिक छायाचित्र

> कोरोना संक्रमणाचा प्रसार जाणून घेण्यासाठी दिल्लीतील सर्व जिल्ह्यांमध्ये सेरोलॉजिकल सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यातील जिल्हा दंडाधिकाऱ्यानी (डीएम) त्यांच्या जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथके तयार केली आहेत.

सर्व जिल्ह्यांत नेमण्यात आलेली ही पथके काही निवडक भागात जाऊन तेथील नागरिकांचे नमुने गोळा करतील. या नमुन्यांच्या तपासणीच्या निकालांच्या आधारे त्या लोकांमध्ये कोरोना विषाणूविरुध्द लढण्यासाठी प्रतिजैविके, प्रतिपिंडे कशी विकसित झाली, हे कळण्यास मदत होणार आहे. त्यानंतर, सर्व नमुन्यांच्या तपासणीच्या आधारे एक अहवाल तयार करुन शासनाला सादर केला जाईल.

कोव्हिड-१९’चे रुग्ण उपचाराशिवाय बरे होतात !

> अवघ्या अर्ध्या तासात, लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी केली जाईल. त्यातून ज्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत, त्या व्यक्तीमध्ये ‘कोव्हिड-१९’शी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे का, हे तपासले जाईल. रक्ताचे नमुने घेण्यासाठी एका विशिष्ट प्रकारचे किट वापरले जाईल. सध्या आयसीएमआरने सर्व कर्मचाऱ्यांची प्रतिजैविक चाचणी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.

> तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल, परंतु ती लक्षणे दिसत नाहीत, तर अशा लोकांमध्ये पाच ते सहा दिवसांच्या आत प्रतिपिंडे आपोआप तयार होऊ लागतात. ही प्रतिपिंडे त्या संक्रमित व्यक्तीच्या शरीरात विषाणू वाढू देत नाहीत, याचा दर शोधणे हाच सिरो सर्वेक्षणाचा हेतू आहे.

> दिल्लीतील कोणत्या भागातील लोकांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यास प्रतिजैविके तयार झाली, कोरोनाची लागण झाली होती, पण आपोआप बरे झालेल्या लोकांची संख्या किती आहे, या सर्व गोष्टी सिरो सर्वेक्षणातून शोधल्या जातील. हे कोरोना विषाणूचा प्रसार आणि त्याची क्षमता शोधण्यातदेखील मदत करेल.

> सिरो सर्वेक्षणात संपूर्ण दिल्लीमधून सुमारे 20 हजार नमुने घेण्यात येतील. दिल्लीच्या प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे 800 ते 1000 नमुने घेतले जातील. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली, संबधित पथके वेगवेगळ्या भागात जाऊन यादृच्छिकपणे घरे निवडून लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करतील. सर्व्हेसाठी, एनसीडीसीने डीएमंना ज्या जिल्ह्यांची यादी दिली आहे, त्याच जिल्ह्यातील भागांमध्ये हे पथके जाणार आहेत.

> ‘राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र’ (एनसीडीसी) गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण करीत आहे. 27 जून ते 10 जुलै या कालावधीत होणाऱ्या या सर्वेक्षणातून कोरोना विषाणूविरूद्ध दिल्लीत रोग प्रतिकारशक्ती किती प्रमाणात विकसित झाली, हे स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: