ब्रेनवृत्त । नवी दिल्ली
भारतात जल हवामानशास्त्रीय आपत्तींमुळे (hydro meteorological calamities) होणाऱ्या जीवित हानीविषयी महत्त्वाची आकडेवारी अलीकडेच जाहीर करण्यात आली आहे. जल हवामानशास्त्राशी संबंधित विविध संकटांमुळे गेल्या तीन वर्षांत देशात जवळपास ६,८०० लोकांचे मृत्यू झाले आहे. अचानक आलेला पूर, भूस्खलन व चक्रीवादळ यांसारख्या आपत्तीमुळे जीव गमावलेल्या लोकांच्या संख्येत पश्चिम बंगाल राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान तामिळनाडूचे काँग्रेस खासदार सु. थिरूनावुक्करासार यांनी लोकसभेत देशात जल हवामानशास्त्रीय आपत्तींमुळे होणाऱ्या जीवितहानी विषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात देशाच्या गृह मंत्रालयाने तपशील जाहीर केला. गृह मंत्रालयाच्या उत्तरानुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये (२०१८-१९ ते २०२०-२०२१) देशात जल हवामानशास्त्रीय आपत्तींमुळे झालेल्या ६,८०८ मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये २०१८-१९, २०१९-२० व २०२०-२१मध्ये अनुक्रमे २४००, २४२२ व १,९८६ लोक दगावले असल्याची नोंद आहे.
देशात सर्वाधिक मृत्यूंची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. गेल्या तीन वर्षांत बंगालमध्ये एकूण ९६४ लोकांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे, जे देशभरातील जल हवामानशास्त्रीय आपत्तींमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंच्या १४% आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, जल हवामानशास्त्रीय आपत्तींमध्ये (hydro meteorological calamities) अचानक पूर येणे (फ्लॅश फ्लड), ढगफुटी आणि भूस्खलन याचा समावेश होतो. मान्सून काळात जवळपास सर्वच भूस्खलन संभावित क्षेत्रांमध्ये अशा दुर्घटना घडत असतात. यांपैकी काही संकटे इतकी जीवघेणी असतात, की त्यामध्ये कित्येकांचे जीव गमावले जातात, असेही मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.
वाचा । प्राणवायू तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एकही मृत्यू नाही!
> कोणत्या राज्यात किती मृत्यू ?
जल हवामानशास्त्रीय आपत्तींमुळे मागील तीन वर्षांत झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीत प. बंगालनंतर ८३३ लोकांच्या मृत्युसह मध्यप्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सर्वाधिक ७०८ लोक केरळमध्ये दगावले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू पूर आल्याने झाले आहेत. २०१८-१९ या काळात केरळमध्ये पुरामुळे ४५५ लोक दगावलेत, तर मध्यप्रदेशात २०१९-२० मध्ये ६७४ लोक दगावले.
महाराष्ट्रात २०१८-९१ ते २०२०-२१ या तीन वर्षांत एकूण ५७१ मृत्यूंची नोंद झाली आहे. दुसरीकडे, नियमितपणे पुराचा सामना करावा लागणाऱ्या आसाम राज्यात ३०३, तामिळनाडूत २०१ तर ओडिशात १४५ लोक दगावल्याची नोंद आहे.
हेही वाचा । राज्य शासनाची पूरग्रस्तांना मदत नव्हे, तर थट्टाच !
> निधीचे वितरण
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत (SDRF : State Disaster Relief Fund) केंद्राद्वारे सर्वाधिक १,२८८.८० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला वितरित करण्यात आला आहे. त्यानंतर सर्वाधिक निधी उत्तरप्रदेश (७७३.२० कोटी) व मध्यप्रदेश (७२८ कोटी) या राज्यांना देण्यात आला आहे.
जल हवामानशास्त्रीय आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंची सर्वाधिक नोंद असलेल्या पश्चिम बंगालला ४०४.४० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. गेल्या तीन वर्षांत प. बंगालने फनी (मे, २०१९), बुलबुल (नोव्हेंबर, २०१९), अँफन (मे, २०२०) व यास (मे, २०२०) अशा एकूण चार उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा (ट्रॉपिकल सायक्लोन्स) सामना केला आहे.
(बातमीलेखन, संपादन व मुद्रितशोधन : मराठी ब्रेन)
सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in