भारतीय संशोधकांनी विकसित केलेल्या कोव्हॅक्सीन (COVAXIN) या स्वदेशी लसीची पहिली मानवी चाचणी दिल्लीतील एम्समध्ये सुरु झाली आहे. एका ३० वर्षीय स्वयंसेवकाला या लसीचा पहिला डोस देण्यात आला.
ब्रेनवृत्त | २५ जुलै
भारतीय संशोधकांनी विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सीन‘ (COVAXIN) या स्वदेशी लसीची पहिली मानवी चाचणी दिल्लीतील एम्समध्ये सुरु झाली आहे. एका ३० वर्षीय स्वयंसेवकाला या लसीचा पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर दोन तासासाठी या स्वयंसेवकाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, त्यानंतर त्याला घरी पाठविले गेले. यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल, अशी माहिती इंडिया टुडेने रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिली आहे.
कोव्हॅक्सिन लसीचा हा पहिलाच डोस असून, डोस देण्यापूर्वी झालेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये ही ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. रुग्णालयाने मानवी चाचणीसाठी आवाहन केल्यानंतर अनेक स्वयंसेवकांनी यात स्वताहून पुढाकार घेत तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली. तथापि, पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी १८ ते ५५ वयोगटातील निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार आहे. तसेच यामध्ये महिलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर पुढील चाचणीसाठी तयार झालेल्या इतर उमेदवारांनाही लसीचा पहिला डोस आणि त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस दिला जाईल.
लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर लसीची चाचणी केलेल्या त्या स्वयंसेवकांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येईल. कोव्हॅक्सीनच्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स हे एक ठिकाण आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व १२ ठिकाणांवरील एकूण ७५० जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.
हैदराबादमधील भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही कोरोना विषाणूवरील लस तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेेशी (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी या संस्थांशी करारही केला आहे. तसेच नुकतेच त्यांना भारतीय औषध महानियंत्रककडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.
वाचा : भारतीय बनावटीच्या दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरू
त्याचप्रमाणे, या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर या लसीचा प्रयोग केला जाणार असून, यामध्ये एम्स रुग्णालयातील १०० जणांचा समावेश केला जाणार आहे. तसेच याबाबत एम्स रुग्णालयाच्या नीतिशास्त्र समितीकडून (एथिक्स कमिटी) या चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालयाने अनेकांना लसीची चाचणी करण्यासाठी स्वयंसेवक बनण्याचे आवाहन केले व काही तासातच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला होता.