भारतीय बनावटीच्या दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरू

वृत्तसंस्था | नवी दिल्ली

कोव्हिड-१९‘वर मात मिळवण्यासाठी देशांतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्सिन’नंतर आता झायडस कॅडिला या कंपनीने बनविलेल्या ‘झायकोव्ह-डी’ (ZyCov-D) या  दुसऱ्या भारतात निर्मित लसीची मानवी चाचणी काल सुरू करण्यात आली. ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’ (आयसीएमआर), भारतीय विषाणूशास्त्र संस्था व भारत बायोटेक यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ची (Covaxin) मानवी चाचणी याआधीच सुरू झाली आहे.

‘झायडस कॅडिला’ (Zydus Cadila) या कंपनीने सांगितल्याप्रमाणे, ‘झायकोव्ह-डी’ लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. झायडस कॅडिला कंपनीने बनविलेली लस ही माणसांवर उपचारांसाठी किती उपयोगी व सुरक्षित आहे, याची पडताळणी करण्याकरिता मानवी चाचणी दोन टप्प्यांत करण्यात येईल. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याला प्रत्येकी ८४ दिवस लागण्याची शक्यता आहे.

‘कोव्हिड-१९’वर प्रभावी ठरणारे ‘डेक्सामेथासोन’ म्हणजे नक्की काय ?

याआधी काही दिवसांपूर्वीच झायडस कॅडिलाच्या अहमदाबाद स्थित ‘लसनिर्मिती तंत्रज्ञान केंद्रा’मध्ये ‘झायकोव्ह-डी’ या लसीच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी ठरल्या होत्या. त्यानंतर या लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास भारतीय औषध महानियंत्रकने (Drug Controller General of India) परवानगी दिली होती. या कंपनीने म्हटले आहे की, झायकोव्ह-डी’ लसीमुळे उंदीर, ससे आदी प्राण्यांतील प्रतिकारशक्तीत वाढ झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा : मॉडर्ना इनकॉर्पोरेटेड जुलै महिन्यात ३० हजार व्यक्तींवर लसीची चाचणी करणार

दरम्यान, भारत बायोटेक व आयसीएमआर बनवलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ (COVAXIN) या लसीच्या मानवी चाचण्या आधीच सुरू झाल्या असून, अशा चाचण्यांपर्यंत पोहोचलेली ती पहिली भारतीय लस आहे. त्यानंतर झायडस कॅडिला कंपनीच्या ‘झायकोव्ह-डी’ (ZyCov-D) लसीचा क्रमांक लागतो. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: