ब्रेनवृत्त, मुंबई
“प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, तरी जूनपासून विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाला सुरूवात करायची”, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिक्षण विभागासोबत झालेल्या बैठकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाच्या पर्यायांवर काम करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. या बैठकीला शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, विभागातील अधिकारी, तज्ज्ञ, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू व्हावे. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणे योग्य नाही. शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत, तरी ऑनलाइन, ऑफलाइन अशा सर्व शक्यतांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करावे. तसेच, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करण्यात याव्यात. सध्या विविध प्रणालींचा वापर करून ऑनलाईन शिक्षण सुरू करावे. मात्र, त्याचवेळी विभागानेही नवी प्रणाली विकसित करावी, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : राज्य शिक्षण मंडळाचे शैक्षणिक नियोजन तयार
हेही वाचा : जुलैमध्ये होणार फक्त पदवीच्या ‘अंतिम सत्रा’च्या परीक्षा !
मात्र, या आरोग्य आणीबाणीच्या काळात शैक्षणिक वर्ष सुरू करताना शिक्षण विभागाने शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक, अशा कोणत्याही संघटनांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला नसल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे, ‘शिक्षण सुरू करायचे, म्हणजे नेमके काय करायचे?’, असा प्रश्न शिक्षक आणि पालक विचारत आहेत.
राज्यात यंदा शैक्षणिक शुल्कवाढ होणार नाही
तर दुसरीकडे, ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी, पालकांआधी शिक्षण विभाग तयार आहे का? ऑनलाईन शिक्षणाचा खर्च शासन उचलणार का? गरीब, मध्यम वर्गीय पालकांनाही हे परवडणारे आहे का? एका कुटुंबात साधारण दोन मुले असतात, मग दोन्ही मुलांच्या डिजिटल शिक्षणाचा खर्च शासन पुरवणार आहे का? असेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.