शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
ब्रेनवृत्त, मुंबई
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, तसेच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येतील, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभागाने घेतला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.
गेल्या तीन महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे देशासह महाराष्ट्रातही सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या, तर शाळाही बंद आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा सुरु करायची की ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायच निवडला जाणार याकडे राज्यातील पालकांचे लक्ष लागले होते. ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या शहरी भागात ऑनलाईन, तर ग्रामीण भागात प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
(संग्रहित छायाचित्र)
आजपासून (ता. १५) नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याचे यापूर्वीच राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार, शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, सोमवारी शाळेचा पहिला दिवस सुरु होत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित आहेत. मात्र ,शिक्षण विभागाकडून पुढील आदेश येईपर्यंत शैक्षणिक कामकाज करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले.
दरम्यान यापूर्वी झालेल्या बैठकीत ऑनलाईन वर्ग सुरु करण्यासंबधीच्या अनेक अडचणीबाबत चर्चा झाली होती. यात राज्यात मोठ्या खासगी शाळा वगळल्या तर आजही बहुतांश शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. विद्यार्थी, पालकांकडेही इंटरनेट घरी असेलच असे नाही. शिवाय, शालेय शिक्षण विभागाकडे डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध नाही. मग विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे, असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहेत.
दरम्यान, पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. मात्र, तिसरी ते पाचवीच्या मुलांना दररोज एक तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाइन पध्दतीने शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी बैठकीदरम्यान दिली.
(प्रातिनिधिक छायाचित्र)
● खालील पद्धतीने शाळा सुरु होतील
रेड झोनमध्ये नसलेल्या राज्यातील ९ ,१० व १२ वी शाळा-कॉलेज जुलैपासून सुरु होतील.
सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरु होतील.
तिसरी ते पाचवीर्यंतचे वर्ग सप्टेंबरपासून सुरु होतील
पहिली आणि दुसरीचे वर्ग व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने सुरु होतील
तसेच, ११ वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे.
सोबतच, ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाहीत तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शालेय शिक्षण प्रायोगिक तत्त्वावर (पायलट प्रोजेक्ट) लगेचच सुरु करण्याचे नियोजन आहे.