Site icon MarathiBrain.in

जॉन्सन व जॉन्सनची लस ठरली पाचवी मान्यताप्राप्त लस!

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


कोव्हिड-१९ आजारावर फक्त एकच गुटी (डोस) पुरेशी असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोव्हिड लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आल्याचे संघ आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले आहे. यामुळे आता देशात आपत्कालीन वापरासाठी मान्यता (EUA : Emergency Use Authorization) मिळालेल्या लसींची संख्या ५ झाली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोव्हिड-१९ लसीला मान्यता दिल्यानंतर “देशातील आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळालेल्या लसींची पाचवर पोहचली आहे. यामुळे देशाच्या कोव्हिड१९ विरुद्धच्या सामूहिक लढाईला अधिक चालना मिळेल”, असे मांडवीय यांनी ट्विटले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकी औषधनिर्माण कंपनीने भारतीय नियामकाकडे परवानगीसाठी अर्ज सादर केला होता.

वाचा | नफेबाज जॉन्सन अँड जॉन्सनवर ₹२३० कोटींचा दंड !

१८ वर्षांपुढील वयोगटातील लोकांचे कोव्हिड-1९ संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी लसीला मान्यता मिळाल्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सनने आनंद व्यक्त केला आहे. कंपनीचे भारतातील प्रवक्ते म्हणाले, “आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे, की भारतीय शासनाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या एकल मात्रा लसीला (Single Dose Vaccine) १८ वर्षे व त्यापुढील वयोगटातील लोकांवर आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

याआधी, एप्रिलमध्ये कंपनीने ती लसीसाठी वैद्यकीय चाचण्या घेण्यासंदर्भात भारताच्या संपर्कात असल्याचे संकेत दिले होते. दुसरीकडे, ज्या लसींना विदेशी औषध नियमकांकडून वापरासाठी मान्यता मिळाली आहे, त्यांना भारतात मान्यता मिळवण्याआधी वैद्यकीय चाचणी पार पाडण्याची तरतूद केंद्र शासनाने काढून टाकली आहे. त्यामुळे आता अशा औषधनिर्माण कंपन्या थेट विनंती अर्ज करू शकतात.

हेही वाचा | अखेर मॉडर्नाच्या लसीला भारतात मान्यता!

जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोव्हिड-१९ लसीच्या भारतातील उत्पादन व निर्मितीसाठी अमेरिकी कंपनीने हैद्राबाद स्थित बायलॉजीकल ई (Biological E) सोबत सहकार्य करार केला आहे.

बायलॉजीकल ईच्या व्यवस्थापकीय संचाकांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, कंपनीत जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या जवळपास ५००-६००  दशलक्ष मात्र उत्पादित केल्या जातील. मात्र ही आकडेवारी वार्षिक उत्पादनाची आहे, की संपूर्ण करार कालावधीतील आहे, हे मात्र अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Exit mobile version