ब्रेनवृत्त । मुंबई
राज्यातील एकूण ३६ पैकी २२ जिल्ह्यांमधील कोव्हिड-१९चे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने काल (सोमवारी) घेतला. यानुसार १४ जिल्हे वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये बहुतांश घडामोडींना परवानगी देण्यात आली आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये रविवार सोडून बाकी दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने व मॉल्स सुरु राहू शकतील, तर सिनेमागृहे बंदच ठेवण्यात निर्णय शासनाने घेतला आहे.
जग करतोय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रवेश!
● काय सुरु राहील आणि काय बंद?
राज्यातील १४ जिल्हे वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये लागू असलेल्या कोव्हिड-१९ संबंधित निर्बंधांमध्ये शासनाने मोठ्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. त्याबाबतची नियमावली खालीलप्रमाणे आहे.
- सर्व अत्यावश्यक असलेली व नसलेली दुकाने (खरेदी मॉल्ससह) सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री ८ पर्यंत उघडी राहू शकतील. मात्र, शनिवारी ह्या सर्व बाबी दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरु राहतील, तर रविवारी पूर्णतः बंद राहतील.
- चित्रपटगृहे, रंगमंच आणि बहूचित्रपटगृहे (मल्टिप्लेक्सेस) पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील.
- सार्वजनिक उद्याने व क्रीडांगणे व्यायाम, सायकलस्वारी, चालणे व धावण्यासाठी सुरु ठेवता येतील.
- शासकीय व खासगी कार्यलये पूर्ण क्षमतेसह सुरु राहू शकतात. तथापि, प्रवासादरम्यान गर्दी टाळण्यासाठी म्हणून त्यांच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्यात.
- शेतीची कामे, बांधकामे व सार्वजनिक नागरी कामे तसेच वस्तूंची दळणवळण पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवता येऊ शकते.
- ज्या कार्यालयांची (ऑफिसेस) कामे ‘घरूनच’ (वर्क फ्रॉम होम) होत आहते, त्यांनी शक्यतोवर ती तशीच सुरु ठेवावीत.
- व्यायामशाळा (जिम्नॅसियम्स), योग केंद्रे, केसकर्तनालये (सलून), सौंदर्यवर्धनालये (ब्युटी पार्लर) सोमवार ते शुक्रवार या दरम्यान रात्री ८ पर्यंत सुरु राहू शकतात, तर शनिवारी त्यांना दुपारी ३ पर्यंतच परवानगी असेल. रविवारी ते पूर्णतः बंद असतील.
- राज्यातील सर्व पूजा-प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील.
- शाळा आणि महाविद्यालयांना राज्याच्या शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे आदेश लागू असतील.
- खानावळी (रेस्तराँ) सोमवार ते शुक्रवार दरम्यान ५०% बैठक क्षमतेसह दुपारी ३ पर्यंत सुरु राहू शकतील. दरम्यान, घरपोच सेवा आधीप्रमाणेच सुरु असेल.
- रात्री ९ ते सकाळी ५ पर्यंत हालचालीवर असलेले निर्बंध मात्र कायम राहतील.
- संभाव्य गर्दी टाळण्यासाठी म्हणून वाढवदिवस समारंभ तसेच राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर लादण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.
सोबतच, मुखपट्टीचा (फेसमास्क) नियमित वापर करणे व सामाजिक अंतर पाळण्यासह कोव्हिड-१९ च्या सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे, असे शासकीय आदेशात म्हटले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५, साथरोग कायदा व भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा | राज्यांमध्ये परत कडक निर्बंधांची शक्यता?
राज्यातील इतर १४ राज्यांपैकी ११ राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्याची कोव्हिड टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू राहील. अशा जिल्ह्यांमध्ये दुकाने, व्यायामशाळा आणि केसकर्तनालये आधीप्रमाणे दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच, चित्रपटगृहे व मॉल्स बंदच राहतील. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यांतील निर्बंधांसंबंधीचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांद्वारे घेण्यात येतील.
Join @ मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in