ब्रेनवृत्त । मुंबई
दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने राज्यातील आमदारांसाठी विशेष भेट जाहीर केली आहे. आमदारांना आता स्थानिक विकास कामांसाठी दरवर्षी ४ कोटींचा निधी मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.
राज्य शासनातर्फे राज्यातील प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघात विकास कामे पार पाडण्यासाठी दरवर्षी ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जातो. आता ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने या निधीत वाढ केली आहे. आमदारांना मिळणाऱ्या निधीत एक कोटींची वाढ केल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला दरवर्षी ४ कोटींचा स्थानिक विकास निधी उपलब्ध करून दिला जाईल.
वाचा । राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : विरोधकांच्या मुद्द्यांवर निर्णय घ्या!
आमदारांच्या निधीमध्ये वाढ केल्याच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना दिलेला शब्द पाळला असल्याचे म्हटले जाते आहे. यामुळे आमदारांना दसऱ्याची खास भेटच देण्यात आली आहे.
आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री @AjitPawarSpeaks यांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ करण्याचा आपला शब्द पाळला आहे. यामुळे आमदारांना दसऱ्याची भेट मिळाली आहे. pic.twitter.com/LNDJjSEULW
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 14, 2021
दरम्यान, राज्यातील आमदारांना तीन कोटींचा स्थानिक विकास निधी मिळत असला, तरी यातील किती निधी व तो कोणत्या कामांवर खर्च होतो, याची ऑनलाईन माहिती उपलब्ध असायला हवी अशी अनेकांची मागणी आहे. याआधी यंदाच्या सुरुवातीलाच आमदारांना मिळणाऱ्या प्रतिवर्ष २ कोटी रुपयांच्या स्थानिक विकास निधीत १ कोटींची वाढ करण्यात आली होती. राज्य विधिमंळात २८८ विधानसभा आमदार तर ७८ विधानपरिषद आमदार अशी संरचना आहे.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in