वृत्तसंस्था, शिकागो
अमेरिकास्थित ‘मॉडर्ना इनकॉर्पोरेटेड’चे ‘कोव्हिड-१९‘वर सुरु असलेल्या लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात पोहचले आहे. जुलै महिन्यात ३० हजार लोकांवर कोरोना लसीची चाचणी सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘केंब्रिज-मॅसाचुसेट्सच्या’ या जैवतंत्रज्ञान (बायोटेक) कंपनीने दिली आहे. या लसीचे मुख्य उदिष्ट म्हणजे कोरोना विषाणूच्या लक्षणांवर प्रतिबंध घालणे आणि ‘कोव्हिड-१९’ महामारीवर नियंत्रण मिळवणे होय. कंपनीच्या या वक्तव्यानंतर प्रीमार्केट ट्रेडमध्ये कंपनीचे शेअर्सही 6 टक्क्यांनी वाढले.
● १ अब्ज मात्रा तयार करण्याचे लक्ष्य
रोगप्रतिकार शक्तीत वाढ होण्यासाठी कंपनीने पुढच्या टप्प्यातील अभ्यासासाठी लसीचा 100 मायक्रोग्राम डोस तयार केला आहे. कंपनीद्वारे दरवर्षी ५०० दशलक्ष डोस तयार करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर, २०२१ या वर्षापासून दरवर्षी 1 अब्ज डोस तयार करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे म्हटले आहे. यासाठी स्विस औषध निर्माता लोन्झा यांच्यासह कंपनी संयुक्तपणे या डोसची निर्मिती अमेरिकेत अंतर्गत उत्पादनाच्या युनिटमध्ये करणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठीदेखील कंपनीने पुरेशी लस तयार केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
● परीक्षणात सहभागी व्यक्तीं १ वर्ष निरीक्षणाखाली
दरम्यान, या मधल्या टप्प्यातील अभ्यासामध्ये 300 निरोगी प्रौढांची निवड केली असून, त्यांना किमान एक शॉट डोस देण्यात आला आहे. सुरुवातीला डोस देण्यात आलेल्या ५० व्यक्ती या १८ ते ५४ वर्षे वयोगटातील आहेत. मात्र, ५४ वर्षे वयाच्या जवळपास असलेल्या लोकांची चाचणी घेणे हे एक कठीण काम असून, त्यांच्यावर विषाणूचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता असते. सामान्यत: त्यांच्यात रोगप्रतिकार शक्ती देखील कमी असते. या प्रक्रियेत 28 दिवसांच्या आत दोन डोस दिले जातात. खबरदारीचा उपाय म्हणून डोस दिलेल्या व्यक्तींवर लसीचा काय परिणाम होतो, याचेही निरीक्षण केले जाते.