देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी सुरू झाली होती. कित्येकदा ही मागणी केंद्राद्वारे धुडकवूनही लावण्यात आली. मात्र, मराठी माणसाने तीव्र लढा दिला व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मराठी भाषिक लढवय्ये ‘संयुक्त महाराष्ट्र’ निर्मितीसाठी झटत राहिले, आणि शेवटी १ मे १९६० रोजी आजचा ‘महाराष्ट्र’ अस्तित्वास आला. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने याच महाराज्याच्या इतिहासावर व प्रवासावर टाकलेला हा थोडासा प्रकाश…
देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सर्व मराठी भाषिकांचे भाषावार प्रांत रचनेच्या आधारे ‘मराठी भाषिक राज्य’ स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे राहिले. ते लढलेही गेले. त्यावेळी प्रत्येक मराठी माणसाला हा लढा आपला वाटला. अखेर, दशकभराच्या दीर्घ लढ्यानंतर मराठी भाषिकांच्या ‘महाराष्ट्र‘ राज्याची निर्मिती झाली ती १ मे १९६० रोजी. “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!” असं म्हणत १९५० ते ६० या दशकात संबंध मराठी भाषिक प्रांत पेटून उठला. अखेर, दिल्लीलाही माघार घ्यावी लागली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची घोषणा केली. तब्बल दशकभर चाललेल्या लढ्याची संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेने स्वप्नपूर्ती झाली.
खरंतर, स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात झाली ती १४ मे १९४६ रोजी बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनापासून. या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘संयुक्त महाराष्ट्रा’च्या निर्मितीचा ठराव संमत करण्यात आला. त्यावेळी, जुलै १९४६ मध्ये या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र परिषद‘ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल १४ वर्षाच्या मोठ्या संघर्षानंतर १ मे १९६० रोजी स्वतंत्र, संयुक्त आणि स्वायत्त अशा महाराष्ट्राची स्थापना झाली.
छायाचित्र स्रोत :ट्विटर
● तब्बल १४ वर्षांचा संघर्ष
‘संयुक्त महाराष्ट्र’ निर्मितीचा संघर्ष तब्बल १४ वर्षे सुरु होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १० ऑक्टोबर १९५५ मध्ये पुन्हा एकदा स्वतंत्र मराठी भाषक राज्याच्या निर्मितीची केलेली मागणी धुडकावून लावण्यात आली. भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर ‘त्रिराज्य योजना’ आखण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संघर्ष करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. कॉंग्रेसचे नेते शंकरराव देव यांनीदेखील संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची मागणी केली. राज्यात महाराष्ट्र निर्मितीचे पहिले आंदोलन २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईत ‘फ्लोरा फाउंटन’ म्हणजेच आजच्या ‘हुतात्मा स्मारक चौक’ या ठिकाणी झाले. मुंबईमधल्या आंदोलनाचे नेतृत्त्व एस.एम. जोशी यांच्याकडे होते. त्यावेळी मराठी माणसाने तीव्र लढा दिला.
‘संयुक्त महाराष्ट्र निर्मिती’च्या चळवळीत झालेल्या आंदोलनांमध्ये पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात अनेकजण जागीच ठार झाले. तर दुसरीकडे, चळवळीतील नाना पाटील, प्रबोधनकार ठाकरे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, लालजी पेंडसे, सेनापती बापट, श्रीपाद अमृत डांगे, यांच्याशिवाय अनेक महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यानंतरही महाराष्ट्र निर्मितीसाठी वातावरण तापत होते. राज्यभरात मुंबई, कोल्हापूर, धुळे, नाशिक, नगर, जळगाव, नागपूर अशा अनेक ठिकाणी आंदोलने, लाठीमार, हरताळ, गोळीबार झाले. चार ते पाच वर्ष सुरु असलेल्या या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तब्बल १०७ जण हुतात्मा झाले.
अखेरीस, १ मे १९६० रोजी ‘महाराष्ट्र‘ हे देशातील १५वे राज्य म्हणून अस्तित्त्वात आले. मात्र ज्या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी तीव्रतेने करण्यात आली, तोच मराठी भाषिक असलेला बेळगाव कारवार, निपाणी हा भाग कर्नाटकात गेला. परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीची ही चळवळ असंख्य पुढाऱ्यांच्या त्यागाने आणि हुतात्म्यांच्या बलिदानाने यशस्वी झाली. याच त्याग आणि बलिदानांमुळे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा ‘इतिहास’ खऱ्या अर्थाने आगळा वेगळा आहे.
◆◆◆