सृजनशील तरुणाईचा ‘विवेक जागर करंडक’ यंदा होणार ऑनलाईन!

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पनवेल शाखा आणि पनवेल विवेकवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विवेक जागर करंडक २०२१’ नाट्य-सादरीकरण स्पर्धा यंदा कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. 

 

ब्रेनवृत्त । पनवेल


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पनवेल शाखा आणि पनवेल विवेकवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विवेक जागर करंडक २०२१’ ही नाट्य-सादरीकरण स्पर्धा यंदा कोव्हिड-१९च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. फेसबुक लाईव्ह आणि झूम अनुप्रयोगाच्या माध्यमातून नेहमीच्याच जल्लोष आणि उत्साहात या स्पर्धेचे आयोजन येत्या १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान होईल. तरीही, राज्यातील तरुणाईने या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे आणि रसिकप्रेक्षकांनी घरबसल्या नि:शुल्क स्पर्धेचा आनंद ‘विवेकसाथी पनवेल’ या फेसबुक पानावरुन घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), शाखा पनवेल आणि पनवेल विवेकवाहिनी यावर्षीही संयुक्तपणे ‘विवेक जागर करंडक २०२१’ ही नाट्य सादरीकरण स्पर्धा येत्या १५ ते १८ ऑगस्ट दरम्यान आयोजित करणार आहे. पण कोरोना विषाणू आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदा ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित होणार आहे. ही स्पर्धा झूम अनुप्रयोग तसेच फेसबुकवरील थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून सादर होणार असून, ‘हिंसेच्या विरोधात, मानवतेकडे’ या अभियानांतर्गत स्पर्धेसाठी यावर्षी ‘म…मारण्याचा की म…माणुसकीचा?‘ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. 

वाचा । पत्र-संस्कृती जतनासाठी ‘वर्डालय’चा पुढाकार : खुली पत्रलेखन स्पर्धा

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला ८ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचा जीव घेणारे मारेकरी सापडले असले, तरीही खरा सूत्रधार मात्र सापडलेला नाही. डॉ. दाभोळकरांच्या खूनाचा निषेध करतानाच कोणत्याही प्रकारची हिंसा ही मानवतेला घातकच आहे आणि अशा प्रकारच्या हिंसा सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असतात, हा विचार समिती रुजवू पाहतेय.

‘विवेक जागर करंडक’चे हे तिसरे वर्ष असून, १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींसाठी ही खुली स्पर्धा आहे. ऑनलाईन मंचावर ई-नाट्य स्वरूपात सादर होणाऱ्या ह्या स्पर्धेत राज्यातील वेगवेगळ्या भागातून विविध महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ह्या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये संवेदनशील विषयांवर एकत्र काम करण्याची, विचारांची घुसळण आणि कलाविष्कार सादर करण्याची तसेच तरुणाईला तिचे म्हणणे सांस्कृतिक अंगाने लोकांपुढे ठेवण्याची उत्तम संधी मिळत असते. सध्याच्या युगात तरुणाईने हिंसामुक्त समाजाचा विचार करावा, मानवतेचा जागर करावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते.

हेही वाचा । ठरलं! तर एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार!

कशी आयोजित होणार स्पर्धा ? 

‘विवेक जागर करंडक २०२१’ ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने फेसबुक लाईव्ह माध्यमातून तसेच झूम अनुप्रयोगाच्या साहाय्याने १८ ऑगस्टला आयोजित होणार आहे. त्यामुळे तरुणाईला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या प्रेक्षकांसाठीही ही वैचारिक व सांस्कृतिक मनोरंजनाची मोठी संधी असणार आहे. अधिकाधिक तरुणाईने यात सहभाग घ्यावा आणि रसिकप्रेक्षकांनी घरबसल्या नि:शुल्क स्पर्धेचा आनंद ‘विवेकसाथी पनवेल’ या फेसबुक पानावरून घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात येत आहे.

१५ व १६ ऑगस्टला ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात आयोजित होईल, तर १८ ऑगस्ट २०२१ रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित होईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, १० ऑगस्ट २०२१ पर्यंत नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ८६५२६१७३८२ व ८०८२६९३९०३ या चलभाष क्रमांकांवर संपर्क साधता येईल किंवा http://vivekjagarkarandak.wixsite.com/Panvel या संकेतस्थळाला भेट देता येईल. 

 

सहभागी व्हा @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

तुमच्या परीसरातील घडामोडी आणि उपक्रमांबद्दल आम्हाला नक्की कळवा.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in वर. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: