भारतात तरुणांच्या आत्महत्या व मानसिक आरोग्य हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे, शालेय मुले-मुली जेव्हा ८वी अथवा ९ वीमध्ये जातात, तेव्हा त्यांना मानसशास्त्र नावाचा एक विषय ठेवण्याची गरज आहे. जेणेकरून मुलांचे प्रबोधन होईल आणि ते कोणाचं मानसिक शोषण अथवा त्यांचं कोणीही मानसिक शोषण करू शकणार नाही.
ब्रेनसाहित्य | २२ जून २०२०
‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग’च्या अहवालानुसार भारतात प्रत्येक दिवशी २८ लोक आत्महत्या करतात. द हिंदूला प्रकाशित एका वृत्तानुसार, सन २०१८ ला १०,००० लोकांनी आत्महत्या केली, तर २०१७ ला ९,९०५ लोकांनी स्वतःहून आपला जीव दिला. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांचा या घटनेकडे लक्ष तेव्हाच जाते, जेव्हा सुशांतसारखा सेलेब्रेटी आपण गमावतो आणि नंतर सुरु होतात लोकांचे मोठमोठाले लेख.
“अरे कोणाला तरी कॉल करायचा होता”पासून “कोणाला मोकळं बोलायचे असेल, तर माझ्याशी बोलत जा” इथपर्यंतचे दिखावे आणि तिथून पुढे तीन-चार दिवस हे पोस्ट वगैरे चालतात, मग बंद होतात. मग परत आपण एखादा सुशांत, भैयूज्जी महाराज, पायल तडवी असो की सागर चिंता (माझ्या जवळचा मित्र मुंबईचा) होण्याची वाट पाहत बसतो.
तुमच्या जवळचा एक मित्र असतो, जो कंपनीत दिवसाच्या सुरुवातीपासून,जेवणाच्यावेळी व प्रत्येक गोष्टीत तुमच्या सोबत असतो. कंपनी सोडल्यानंतर सुद्धा दुसऱ्या गावाला जाताना तो तुम्हाला सांगून जातो. अचानक एक दिवस दुसऱ्याकडून तुम्हाला त्याच्या कायमचं जाण्याविषयी कळते. मात्र, समोरची व्यक्ती सामान्य कुटूंबातील असल्यामुळे ना कुणी त्यांच्या जाण्यावर “त्यांनी असं का केलं” असा विचार करत नाही किंवा कोणी दुखी होता नाही. कारण ती व्यक्ती एका सामान्य कुटुंबातील असते आणि भारतात अशा सरासरी २८ घटना रोज घडतात.
आयआयटींमध्ये पाच वर्षांत ५० विद्यार्थ्यांच्या आत्महत्या !
दोन दिवसांआधी पुण्यात एकाच कुटुंबातील ४ लोकांनी आत्महत्या केली, पण त्याबद्दल समाजात कुठेच काही प्रतिक्रिया उमटली नाही किंवा कोणालाही “बोलावसं वाटलं तर माझ्याशी बोला” म्हणणारे तत्सम लोक कुठेच नव्हते. सांगायचं तात्पर्य एवढाच, की अशावेळी कोणीही त्या व्यक्तीला साथ देत नाही, याउलट एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल, तर त्याला दुर्लक्षित किंवा टार्गेट करण्याकडेच लोकांचा कल जास्त पाहायला मिळतो.
अशा गोष्टींची सुरुवात शाळेपासून देखील होते. एखादा मुलगा नाराज किंवा मानसिक त्रासात दिसत असेल, तर अनेकवेळा शिक्षकच त्याच कारण जाणून न घेता त्यांच्यावर वर्गात अजून मस्करी करून त्याला चेष्टेचा विषय बनवतात. एखादा मुलगा-मुलगी जर थोडी दडपणात राहत असेल, तर त्या व्यक्तीची मानसिक छळ किंवा शोषण केल्या जाते आणि मग त्या व्यक्तीच जगणं असह्य होते. अगदीच याचा परिणाम त्या व्यक्तीचा अभ्यास आणि इतर गोष्टींवर होते. समूहाने मिळून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणे सोपे जाते, त्यामुळे इतर लोकसुद्धा अशावेळी त्या व्यक्तीला टार्गेट करण्याचा पाहतात.
भारतात तरुणाच्या आत्महत्या व मानसिक आरोग्य हा अजूनच वाढत जाणारा एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षणात जेव्हा मुले-मुली ८वी अथवा ९ वीमध्ये जातात, तेव्हा त्यांना मानसशास्त्र नावाचा एक विषय ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून मुलांचे प्रबोधन होईल आणि ते कोणाचं मानसिक शोषण अथवा त्यांचं कोणीही मानसिक शोषण करू शकणार नाही. पण या सोबतच गरज आहे पालकांनी आपल्या पाल्याना मानसिक दृष्टीने खंबीर बनवण्याची, त्यांना चांगली शिकवण देण्याची. जेणेकरून ते या गोष्टीला बळी पडू नयेत आणि त्यांच्यामुळे सुद्धा कोणी अशा प्रकारचे पाऊल उचलू नाही.
आयुष्य हे एकदाच मिळत. एखाद्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होता असेल, तर ती गोष्ट सोडून द्या, पण असे पर्याय उचलू नका !
लेख : प्रसाद पाचपांडे, जि. अमरावती
ट्विटर : @prasadpachpandhe
ई-मेल : prasadpachpande12@gmail.com
◆◆◆
(प्रस्तुत लेखात प्रकाशित माहिती आणि विचार हे पूर्णतः लेखकांच्या हक्काधीन असून, मराठी ब्रेन व संपादक मंडळ त्या विचारांशी सहमत असेलच असे नाही.)
अशीच विविधांगी माहिती, विश्लेषण, बातम्या, साहित्य आपल्या मायबोली मराठीतून थेट जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.
Subscribe on Telegram @marathibraincom