नावात काय आहे…..?

व्यापारवृद्धीसाठी भारतात रेल्वे आणण्याचा निर्णय झाला. यानंतर रेल्वे प्रत्यक्षात धावू लागली. अनेक नव्या स्थानकाच्या निर्मितीची गरज असल्याने 1867 साली माझ्या आदेशानुसार स्थानक उभारण्यात आले. तेच हेे एल्फिन्स्टन रोड स्थानक. नावात काय आहे असे म्हणतात, त्यामुळे माझे नाव बदलण्यास माझा आक्षेप नाही फक्त एक सल मनात टोचत आहे, मी पाहिलेले स्वप्नांतील एल्फिन्स्टन स्थानक आज खरंच अस्तित्वात आहे? असा प्रश्न मला भेडसावत असल्याने तुमच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला, होय मी लॉर्ड एल्फिन्स्टन बोलतोय.

1853 ते 1860 या काळात माझे या बेटांच्या शहरावर वर्चस्व होते. यामुळे केवळ एल्फिन्स्टन नव्हे तर मलाबार हिल येथील वास्तव्यास योग्य ठिकाण बनवण्याची संकल्पना देखील माझीच होती.किंबहुना मी एकहाती अंमलात आणली.शिक्षणासाठी एल्फिन्स्टन महाविद्यालयाची देखील उभारणी माझ्या साम्राज्यातच करण्यात आली. इतिहास जाणल्याशिवाय भविष्य घडत नाही, यामुळे इतिहासात डोकावतो. तत्पूर्वी, अनेक वर्षे मुंबईत राहिल्यामुळे मुंबई करांचा विसरभोळेपणा माझ्या ही अंगी आला.
माझ्या स्मृतीनुसार, स्थानक उभारणीनंतर याचा प्रामुख्याने फायदा मिल आणि फॅक्टरी कर्मचाऱयांना मोठ्या प्रमाणात झाला. तेव्हा आणि आज परिस्थिती फार वेगळी नाही. 2000 सालाच्या सुरुवातीला तेंव्हाचा ‘ब्ल्यू कॉलर’ प्रवासी आज ‘व्हाइट कॉलर’ झाला, हे नक्की. एकेकाळी मी उभारलेल्या स्थानकाच्या परिसरात गिरण्या धडधडत होत्या. मात्र आज धडधड आहे ती उंच-सॉफीस्तिकेटेड कार्यालयांमध्ये तणावाखालील कर्मचाऱ्यांच्या हृदयाची.
  मी अनेक घटनांचा साक्षीदार आहे. 1992 च्या दंगलीची आग मी धगधगताना पाहिली आहे. लोकल साखळी बॉम्बस्फोटामुळे माझ्या पायाखालची जमीन खचल्याची पहिली आहे. तर प्रवाशांच्या मरणाकांत आरोळ्याच्या वेदना ही मी अनुभवल्या आहेत. प्रवाशाना अपुऱ्या सोई देण्यासाठी मी स्थानक उभारले होते ? नाही. मी इस्ट इंडियाचा प्रतिनिधी होतो मात्र माझ्याकडील स्थापत्यशास्त्राचा दृष्टीकोनाचा मी पुरेपूर वापर प्रवाशांसाठी केला होता. मला कोणावर टीका करायची नाही किंबहुना आम्ही कसे चांगले होतो हे देखील सांगायचे नाही. मात्र सध्य परिस्थिती नक्की विषद करायची आहे. कारण मुंबईकरांना विसरण्याची सवय असल्याने नामांतरनंतर मला पुन्हा बोलण्याची संधी मिळणार नाही. याची मला खात्री आहे.
एल्फिन्स्टन रोड स्थानक उभारणीला 150 वर्षे पूर्ण झाली. काळ ज्या वेगाने पुढे सरकला त्या वेगाने माझ्या स्थानकातील सुविधाचा विस्तार झाला नाही. यामुळे स्थानकातील प्रवासी भार वाढत गेल्याने मी असहय ठरत गेलो. कॉर्पोरेट भाषेत सांगायचे झाल्यास ‘बॅकलॉग’ प्रचंड वाढला. यामुळे 26 सप्टेंबर 2017 साली दुर्घटनेनंतर अद्याप ही माझे मन सुन्न आहे. अस्मानी करिष्म्याला सुलतानी अकार्यक्षमतेची साथ मिळाल्यामुळे 23 निष्पाप जणांच्या मृत्यू आणि जखमी 39 प्रवाशांचा कलंक स्थानकाच्या पर्यायी माझ्या नावावर गोंदला गेला. यानंतर अनेक समिती स्थापन झाल्या. अनेक वेळा पाहणी झाली. नुकतेच बदल ही झाले. मात्र ते केवळ माझ्या स्थानकापूरतेच. आज ही सात बेटांच्या या मुंबई शहराला स्वप्नातील रेल्वे स्थानकाची गरज आहे.
स्थानके कशी हवी ? काय सुविधा हव्या ? हे मी सांगणार नाही.या साठी तुमच्याकडे तज्ञ आहेत. माझ्या पेक्षा 150 वर्षांनी अधिक प्रगत विचार तुमचे आहेत. तुम्ही तंत्रज्ञानांनी परिपुर्ण आहात तरी देखील यात भविषयाचा पाहन्याचा वेध घेणारी नजर कुठे तरी अडखळत आहे. यामुळे केवळ उपाययोजना कागदावर मांडण्यापेक्षा भविष्य डोळ्यासमोर ठेवून वर्तमानात आवश्यक बदल करा, हा आदेश मात्र नक्की देईल.
माझे नाव बदलले याचा राग नाही पण नाव बद्दलण्याने परिस्थिती बदलणार आहे का ? या प्रश्नाच्या उत्तराचा मी शोध घेत आहे. विशेष म्हणजे माझ्या नामकरणाचा पहिला आघात 1991 साली मारला गेला आणि अखेरचा घाव 2018 साली. तब्बल 27 वर्षांनंतर नामकरण पूर्ण झाले. ही माझी लढाऊवृत्ती ? की प्रशासकीय अनास्था ? तुम्हीच ठरवा, कारण तुम्ही मुंबईकर असून विसरणे हा गुण धर्म तुमच्या रक्तातील ‘डीएनए’ मध्ये आहे.
– बोलका बुवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: